Pca act 1988 कलम ८ : लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम ८ :
१.(लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध :
१) जो कोणताही व्यक्ति, निम्नलिखित आशयाने कोणत्याही व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तींना अनुचित फायदा देतो किंवा देण्याचे वचन देतो –
एक) लोक सेवकाला अयोग्यरित्या लोक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रवृत्त करील; किंवा
दोन) लोक सेवकाला लोक कर्तव्य अयोग्यरित्या पार पाडण्यासाठी बक्षीस देईल,
तो व्यक्ती, सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास आणि द्रव्यदंडास किंवा दोन्हींस पात्र होईल :
परंतु असे की, जेथे एखाद्या व्यक्तीला असा अनुचित फायदा किंवा लाभ देण्यास विवश किंवा सक्ती केली जाते तेथे या कलमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत :
परंतु आणखी असे की अशा विवश व्यक्ति किवा सक्ती केलेली व्यक्ती अनुचित लाभ दिल्याच्या तारीखे पासून सात दिवसांच्या आत कायदा अंमलबजावणी प्राधिकारी किंवा अन्वेषण यंत्रणेकडे या प्रकाराचा अहवाल किंवा तक्रार करील :
परंतु आणखी असे की, या कलमाअंतर्गत अपराध हा वाणिज्यिक संगठन द्वारा केला असेल तर असे वाणिज्यिक संगठन दंडास पात्र होईल.
दृष्टांत :
पी हा व्यक्ती, लोक सेवक एस ला, इतर सर्व बोलीदारांपैकी त्याला परवाना मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये देतो, पी या कलमाअंतर्गत अपराधाकरीता दोषी आहे.
स्पष्टीकरण :
ज्या व्यक्तीला अनुचित फायदा देण्यात आला आहे किंवा देण्याचे वचन दिले आहे तीच व्यक्ती ज्याने संबंधित लोक कर्तव्य पार पाडायचे आहे किंवा पार पाडले आहे तीच व्यक्ती आहे की नाही हे महत्वाचे नाही आणि असा अनुचित फायदा त्या व्यक्ती द्वारा किंवा अन्य तृतीय पक्षाद्वारे दिला जातो किंवा देण्याचे वचन दिले जाते हे महत्वाचे नाही.
२) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीला लागू होणार नाही, जर ती व्यक्ती, नंतरच्या होणाऱ्या अपराधाच्या विरोधात सहाय्य करण्यासाठी, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकाऱ्याला किवा अन्वेषण यंत्रनेला कळवळ्यानंतर, इतर अन्य व्यक्तीला अनुचित फायदा देतो किंवा देण्याचे वचन देतो.)
———
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ४ अन्वये कलम ७, ८, ९ आणि १० ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply