भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २ :
व्याख्या :
(a) क) अ) निवडणूक या संज्ञेचा अर्थ, संसद किंवा कोणतेही विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरण यांतील सदस्याची निवड करण्यासाठी कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे घेतलेली निवडणूक, असा असेल.
(aa) १.(कक) अअ) विहित म्हणजे या अधिनियमाद्वारे केलेल्या नियमाद्वारे विहित अभिप्रेत आहे व त्यानुसार विहित याचा अर्थ लावला जाईल;)
(b) ख) ब) सार्वजनिक कर्तव्य याचा अर्थ, जे कर्तव्य पार पाडण्याची राज्याला, समाजाला किंवा सर्व जनतेला आस्था आहे असे कर्तव्य, असा असेल.
स्पष्टीकरण :
या खंडामधील राज्य या संज्ञेमध्ये केंद्रीय, प्रातिक किंवा राज्य अधिनियमांन्वये स्थापन करण्यात आलेले कोणतेही महामंडळ, किंवा शासनाच्या किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) याच्या कलम ६१७ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे शासकीय कंपनीच्या मालकीचे किंवा तिने नियंत्रित केलेले किंवा तिने अर्थसहाय्य दिलेले कोणतेही प्राधिकरण किंवा संस्था यांचा अंतर्भाव असेल.
(c) ग) क) लोकसेवक याचा अर्थ
१) शासनाच्या सेवेत असलेली किंवा शासनाकडून वेतन घेणारी किंवा कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून फीच्या किंवा कमिशनच्या स्वरूपात परिश्रमिक घेणारी कोणतीही व्यक्ती;
२) स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत असलेली किंवा त्याच्याकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती;
३) केंद्रीय प्रांतिक किंवा राज्य अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली स्थापन करण्यात आलेल्या महापालिकांच्या किंवा शासनाच्या किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) च्या कलम ६१७ मध्ये व्याख्या दिल्यानुसार असलेल्या कोणत्याही शासकीय कंपनीच्या मालकीच्या किंवा अर्थसहाय्य दिलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा संस्थेच्या सेवेत असलेली किंवा त्याच्याकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती;
४)कोणतीही न्यायविषयक कर्तव्ये, एकतर स्वत: किंवा कोणत्याही व्यक्तींच्या गटाचा सदस्य म्हणून पार पाडण्यासाठी कायद्याने अधिकार प्रदान केलेल्या कोणत्याही व्यक्तींसह कोणताही न्यायाधीश;
५)न्यायदानाच्या संबंधातील कोणतेही कर्तव्य पार पाडण्यासाठी, न्यायालयाने प्राधिकृत केलेली व अशा न्यायालयाने नेमलेली, समापक(लिक्विडेटर), प्रापक (रिसिवर) किंवा आयुक्त यांचा समावेश असलेली कोणतीही व्यक्ती;
६)न्यायालयाने किंवा सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने निर्णयासाठी किंवा ज्याच्याकडे कोणताही वाद किवां प्रकरण संदर्भित केले असेल असा कोणताही लवाद(आरबीटड्ढेटर)किंवा कोणतीही व्यक्ती;
७)आपल्या पदाच्या नात्याने ज्या कोणत्याही व्यक्तीला मतदार याद्या तयार करणे, त्या प्रकाशित करणे, त्या बाळगणे किंवा त्यात सुधारणा करणे किंवा निवडणूक किंवा आंशिक निवडणूक घेणे यासंबंधीचे अधिकार देण्यात आले असतील अशी कोणतीही व्यक्ती;
८)आपल्या पदाच्या नात्याने जिला कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले असेल किंवा त्यासाठी भाग पाडण्यात आले असेल अशी कोणतीही व्यक्ती;
९)केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून किंवा केंद्रीय, प्रांतिक किंवा राज्य अधिनियमाखाली किंवा त्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही महामंडळाकडून किंवा शासनाच्या मालकीचे किंवा शासनाचे नियंत्रण असलेले किंवा त्याकडून अर्थसहाय्य मिळणारे कोणतेही प्राधिकरण किंवा संस्था यांच्याकडून किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) च्या कलम ६१७ मध्ये व्याख्या दिलेल्या शासकीय कंपनीकडून कोणतेही अर्थसहाय्य प्राप्त करणाऱ्या किंवा प्राप्त केलेल्या अशा शेतकी, औद्योगिक, व्यापारी किंवा बँक व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत सहकारी संस्थेचा अध्यक्ष, सचिव किंवा पदाधिकारी असलेली कोणतीही व्यक्ती;
१०) कोणत्याही नावाने परिचित असलेल्या कोणत्याही सेवा आयोगाचा किंवा मंडळाचा अध्यक्ष, सदस्य किंवा कर्मचारी असलेली कोणतीही व्यक्ती, किंवा कोणत्याही अशा आयोगाने किंवा मंडळाने कोणतीही परीक्षा घेण्यासाठी किंवा असा आयोग किंवा मंडळ यांच्या वतीने कोणतीही निवड करण्यासाठी नेमलेल्या कोणत्याही निवड समितीचा सदस्य;
११)कुलगुरू किंवा विद्यापीठाच्या नियामक मंडळाचा सदस्य असलेली किंवा कोणत्याही विद्यापीठाचा प्राध्यापक, प्रपाठक, अधिव्याख्याता किंवा कोणतीही इतर शिक्षक किंवा कोणत्याही पदावर काम करणारा कर्मचारी किंवा विद्यापीठाने किंवा कोणत्याही इतर सार्वजनिक प्राधिकरणाने परीक्षा घेण्यासाठी किंवा त्या पार पाडण्यासाठी यासंबंधात ज्याच्या सेवा घेतल्या असतील अशा व्यक्ती;
१२)कोणत्याही प्रकारे स्थापन केलेल्या, केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन किंवा स्थानिक किंवा इतर सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडून कोणतीही आर्थिक मदत घेणाऱ्या किंवा घेत असलेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा इतर संस्थेचा पदाधिकारी किंवा कर्मचारी असलेली कोणतीही व्यक्ती.
(d) १.(घ) अनुचित फायदा म्हणजे कायदेशीर मोबदला व्यतिरिक्त इतर कोणताही फायदा.
स्पष्टीकरण :
या खंडाच्या प्रयोजनाकरिता,-
(a) क) परितोषण हा शब्द पैशाच्या स्वरूपातील परितोषणापुरता किंवा ज्याचे पैशात मूल्य करता येईल अशा परितोषणापुरता मर्यादित नाही.
(b) ख) कायदेशीर पारिश्रमिक हे शब्द, ज्यांसाठी लोकसेवक कायद्याने मागणी करू शकतो अशा पारिश्रमिकापुरता मर्यादित नाही तर, तो ज्या ठिकाणी सेवा करीत असेल अशा शासनाने किंवा संघटनेने जे स्वीकारण्याची त्यास परवानगी दिली असेल अशा सर्व प्रकारच्या परिश्रमिकाचा त्यात समावेश असेल.)
स्पष्टीकरण १ :
उपरोक्त कोणत्याही उपखंडाखाली येणाऱ्या कोणत्याही व्यक्ती- मग त्यांना शासनाने नेमलेले असो किंवा नसो, लोकसेवक आहेत.
स्पष्टीकरण २ :
लोकसेवक या शब्दाचा वापर करण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ, लोकसेवकाचे पद प्रत्यक्षपणे धारण करत असेल अशी प्रत्येक व्यक्ती- मग असे पद धारण करण्याच्या अधिकारात कोणतेही कायदेशीर दोष असोत- असा असेल.
————
१. सन २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम २ द्वारा समाविष्ट करण्यात आले.