Site icon Ajinkya Innovations

Passports act कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम १० :
पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे :
(१) पासपोर्ट प्राधिकरण, कलम ६ च्या पोटकलम (१) चे उपबंध किंवा कलम १९ खालील कोणतीही अधिसूचना विचारात घेऊन, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र यावरील पृष्ठांकनामध्ये फेरफार करू शकेल किंवा ते रद्द करू शकेल अथवा ज्या शर्तीच्या अधीनतेने पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्यात आले असेल, अशा (विहित शर्तीखेरीज इतर) शर्तींमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेने फेरफार करू शकेल किंवा त्या रद्द करू शकेल आणि या प्रयोजनासाठी, पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाला लेखी नोटिशीद्वारे त्या नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत पासपोर्ट किंवा प्रवासपत्र परत आपल्या स्वाधीन करण्यातस फर्मावू शकेल आणि धारकाला अशा नोटिशीचे अनुपालन करावे लागेल
(२) पासपोर्ट प्राधिकरण, पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने केलेल्या अर्जावरून आणि केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेने पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या (विहित शर्तीखेरीज इतर) शर्तींमध्ये फेरफारही करू शकेल किंवा त्या रद्दही करू शकेल
(३) पासपोर्ट प्राधिकरण पुढील प्रकरणी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र अडकवून ठेवू शकेल किंवा अडकवून ठेवण्याची तजवीज करू शकेल किंवा ते रद्द करू शकेल :
(a)(क)(अ) जर पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने ते गैरपणे कब्जात ठेवले आहे याबद्दल पासपोर्ट प्राधिकरणाची खात्री झाली असेल तर;
(b)(ख)(ब) महत्त्वाची माहिती दडपवून ठेवून, अथवा पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने किंवा त्यांच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने चुकीची माहिती पुरवून त्या आधारावर पासपोर्ट किंवा प्रवासपत्र मिळविले असेल तर :
१.(परंतु अशा पासपोर्टाच्या धारकाने दुसरा पासपोर्ट मिळवला तर पासपोर्ट प्राधिकरण असा दुसरा पासपोर्टही अडकवून ठेवील किंवा अडकवून ठेवण्याची तजवीज करील किंवा तो रद्द करील;)
(c)(ग)(क) भारताची सार्वभौमता व एकात्मता, भारताची सुरक्षितता व भारताचे इतर कोणत्याही परकीय देशांशी असलेले मैत्रीचे संबंध यांच्या हिताच्या दृष्टीने किंवा सर्वसाधारण जनतेच्या हिताच्या दृष्टीने पासपोर्ट प्राधिकरणाला असे करणे आवश्यक वाटत असेल तर;
(d)(घ)(ड) जर पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाला, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र दिल्यानंतर केव्हातरी भारतातील एखाद्या न्यायालयाने नैतिक अध:पात अनुस्यूत असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवले असेल आणि त्या संदर्भात त्याला किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली असेल तर;
(e)(ङ) (इ) पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने जो अपराद केल्याचे अभिकथन करण्यात आले आहे, अशा एखाद्या अपराधाबाबतची कार्यवाही भारतातील फौजदारी न्यायालयापुढे प्रलंबित असेल तर;
(f)(च)(फ) पासपोर्ट किंवा प्रवासपत्र यातील कोणत्याही शर्तींचे उल्लंघन करण्यात आले असेल तर;
(g)(छ) (ग) पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने पासपोर्ट किंवा प्रवासपत्र परत करण्यास फर्माविणाऱ्या, पोटकलम (१) खालील नोटिशीचे अनुपालन करण्यात कसूर केली असेल तर;
(h)(ज)(ह) त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार न्यायालयाने पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाला उपस्थित राहण्याबाबतचे वॉरंट किंवा समन्स किंवा त्याच्या अटकेचे वॉरंट काढले आहे असे पासपोर्ट प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले तर, अथवा, अशा कोणत्याही न्यायालयाने पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाला भारताबाहेर प्रयाण करण्यास मनाई करणारा आदेश दिलेला असेल आणि अशा प्रकारचे वॉरंट किंवा समन्स काढण्यात आलेले आहे किंवा अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे याबाबत पासपोर्ट प्राधिकरणाची खात्री झालेली असेल तर,
(४) पासपोर्ट प्राधिकरण, पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाने केलेल्या अर्जावरून तो पासपोर्ट किंवा प्रवासपत्र रद्दही करू शकेल
(५) जेव्हा पासपोर्ट प्राधिकरण, पोटकलम (१) अन्वये पासपोर्ट किंवा प्रवासपत्र यावरील पृष्ठांकनामध्ये फेरफार करणारा किंवा तो रद्द करणारा, किंवा त्याच्या शर्तीमध्ये फेरफार करणारा आदेश देईल किंवा पोटकलम (३) अन्वये पासपोर्ट किंवा प्रवासपत्र अडकवून ठेवण्याचा किंवा तो रद्द करण्याचा आदेश देईल तेव्हा, ते प्राधिकरण असा आदेश देण्याबाबतच्या कारणांचे संक्षिप्त निवेदन लेखी नमूद करील आणि पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाच्या मागणीवरून त्याला त्याची एक प्रत देईल, मात्र, एखाद्या बाबतीत अशा निवेदनाची प्रत देणे हे भारताची सार्वभौमता व एकात्मता, भारताची सुरक्षितता, भारताचे कोणत्याही परकीय देशाशी असलेले मैत्रीचे संबंध यांच्या दृष्टीने हिताचे किंवा सर्वसाधारण जनतेच्या हिताचे होणार नाही असे पासपोर्ट प्राधिकरणाचे मत असेल तर गोष्ट अलाहिदा (वेगळी).
(६) पासपोर्ट प्राधिकरण हे ज्या प्राधिकरणाच्या अधीन असेल त्या प्राधिकरणास, पासपोर्ट प्राधिकरण ज्या कारणावरून पासपोर्ट किंवा प्रवासपत्र अडकवून ठेवू शकते किंवा रद्द करू शकते, अशा कोणत्याही कारणास्तव असा पासपोर्ट किंवा प्रवासपत्र लेखी आदेशाद्वारे अडकवून ठेवता येईल किंवा अडकवून ठेवण्याची तजवीज करता येईल किंवा रद्द करता येईल आणि अशा प्राधिकरणाद्वारे पासपोर्ट किंवा प्रवासपत्र अडकवून ठेवण्याच्या बाबतीत किंवा रद्द करण्याच्या बाबतीत या कलमाचे पूर्वगामी उपबंध शक्य असेल तेथवर लागू होतील
(७) पासपोर्टाच्या किंवा प्रवासपत्राच्या धारकाला या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमांन्वये कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवणारे न्यायालय पासपोर्ट किंवा प्रवासपत्र रद्दही करू शकेल :
परंतु, अपिलान्ती किंवा अन्यथा दोषसिद्धी रद्द ठरवण्यात आली तर, असा पासपोर्ट किंवा प्रवासपत्र रद्द करणे हे शून्य ठरेल.
(८) पासपोर्ट किंवा प्रवासपत्र रद्द करण्यासंबंधीचा पोटकलम (७) खालील आदेश अपील न्यायालयालाही किंवा आपल्या पुनरीक्षणाच्या शक्तींचा वापर करत असताना उच्च न्यायालयालाही करता येईल
(९) या कलमान्वये पासपोर्ट किंवा प्रवासपत्र रद्द करण्यात आले असता, तो पासपोर्ट किंवा प्रवासपत्र आधीपासूनच अडकवून ठेवण्यात आले नसेल तर, त्याच्या धारकाला ज्या प्राधिकरणाने ते रद्द केले असेल त्या प्राधिकरणाकडे किंवा रद्द करण्यासंबंधीच्या आदेशात याबाबतीत जे प्राधिकरण विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा दुसऱ्या एखाद्या प्राधिकरणाकडे ते विनाविलंब परत करावे लागेल.
——-
१. १९९३ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version