राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम ५ :
स्थानबद्धतेचे ठिकाण व शर्ती विनियमित करण्याचा अधिकार :
जिच्या संबंधात स्थानबद्धता आदेश काढण्यात आला असेल अशी प्रत्येक व्यक्ती –
(a)(क) समुचित शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा ठिकाणी आणि परिरक्षण, शिस्त आणि शिस्तभंगादाखल शिक्षा यासंबंधीच्या शर्तीसह अशा शर्तीवर स्थानबद्ध केली जाण्यास; आणि
(b)(ख) समुचित शासनाच्या आदेशान्वये स्थानबद्धतेच्या एका ठिकाणाहून स्थानबद्धतेच्या दुसऱ्या ठिकाणी – मग ते ठिकाण त्याच राज्यात असो किंवा अन्य राज्यात असो – हलविली जाण्यास पात्र असेल;
परंतु, एखाद्या राज्य शासनाला खंड (ख) अन्वये एखाद्या व्यक्तीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलविण्याचा आदेश, त्या दुसऱ्या राज्याच्या शासनाच्या संमतीखेरीज देता येणार नाही.