Nsa act 1980 कलम १४-क : १.(सल्लागार मंडळाचे मत न घेता व्यक्तींंना ज्या परिस्थितीत तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी स्थानबद्ध ठेवता येते ती परिस्थिती :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १४-क :
१.(सल्लागार मंडळाचे मत न घेता व्यक्तींंना ज्या परिस्थितीत तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी स्थानबद्ध ठेवता येते ती परिस्थिती :
(१) या अधिनियमाच पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, २.(८ जून Ÿ१९८९) पूर्वी कोणत्याही वेळी जिच्या संबंधात या अधिनियमान्वये स्थानबद्धता आदेश काढण्यात आला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला शांतताभंग झालेल्या कोणत्याही क्षेत्रात –
(एक) दहशतवादी आणि विध्वंसक कारवायांना तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणे; आणि
(दोन)(a)(क) भारताच्या संरक्षणाला, किंवा
(b)(ख) भारताच्या सुरक्षिततेला, किंवा
(c)(ग) राज्याच्या सुरक्षिततेला, किंवा
(d)(घ) सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखण्यास, किंवा
(e)(ङ) समाजाला अत्यावश्यक असलेला पुरवठा व सेवा चालू ठेवण्यास
कोणत्याही प्रकारे बाधक होईल असे वर्तन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्थानबद्ध करण्यात आले असेल त्याबाबतीत, सल्लागार मंडळाचे मत न घेता, तिच्या स्थानबद्धतेच्या दिनांकापासून तीन महिन्यांपेक्षा जास्त परंतु सहा महिन्यांपेक्षा अधिक नाही अशा कालावधीसाठी स्थानबद्ध ठेवता येइल.
स्पष्टीकरण १ :
कलम ३ च्या पोटकलम (२) स्पष्टीकरणाच्या तरतुदी या जशा त्या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी लागू होतात तशाच प्रकारे त्या या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी लागू होतील.
स्पष्टीकरण २ :
या पोटकलमातील शांतताभंग झालेले क्षेत्र याचा अर्थ पंजाब शांतताभंग झालेली क्षेत्रे अधिनियम, १९८३ (१९८३ चा ३२) याच्या कलम ३ अन्वये, किंवा चंदीगड शांतताभंग झालेली क्षेत्रे अधिनियम, १९८३ (१९८३ चा ३३) याच्या कलम ३ अन्वये अधिसूचनेद्वारे त्या वेळेपुरते शांतताभंग झालेले क्षेत्र असल्याचे घोषित करण्यात आले असेल असे कोणतेही क्षेत्र असा आहे.
स्पष्टीकरण ३ :
या पोटकलमात, दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया म्हणजे दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया (प्रतिबंध) अध्यादेश, १९८७ (१९८७ चा अध्यादेश २) च्या अर्थानुसार दहशतवादी कृत्ये आणि विध्वंसक कारवाया.
(२) ज्या व्यक्तीला पोटकलम (१) लागू होते अशा कोणत्याही व्यक्तीच्या प्रकरणी कलम ३, कलम ८, कलम १० ते १४ ही पुढील फेरफारांस अधीन राहून अमलात येतील, ते फेरफार असे :
(a)(क) कलम ३ मध्ये,
एक) पोटकलम (४) च्या परंतुकामध्ये,-
(A)(अ) दहा दिवस शब्दांऐवजी पंधरा दिवस हे शब्द दाखल करण्यात येतील,
(B)(आ) पंधरा दिवस शब्दोंऐवजी वीस दिवस हे शब्द दाखल करण्यात येतील;
दोन) पोटकलम (५) मध्ये सात दिवस शब्दांऐवजी पंधरा दिवस शब्द दाखल करण्यात येतील;
(b)(ख) कलम ८ च्या पोटकलम (१) मध्ये, दहा दिवस शब्दांऐवजी पंधरा दिवस शब्द दाखल करण्यात येतील;
(c)(ग) कलम १० मध्ये, तीन आठवड्यांच्या आत या शब्दांऐवजी चार महिने व दोन आठवड्यांच्या आत हे शब्द दाखल करण्यात येतील;
(d)(घ) कलम ११ मध्ये,
(एक) पोटकलम (१) मध्ये, सात आठवड्यांच्या या शब्दांऐवजी पाच महिने व तीन आठवड्यांच्या हे शब्द दाखल करण्यात येतील;
(दोन) पोटकलम (२) मध्ये, संबंधित व्यक्तीच्या स्थानबद्धतेसाठी शब्दांऐवजी संबंधित व्यक्तीच्या अखंड स्थानबद्धतेसाठी हे शब्द दाखल करण्यात येतील;
(e)(ङ) कलम १२ मध्ये, स्थानबद्धतेसाठी हा शब्द जेथे जेथे आलेला आहे त्या दोन्ही ठिकाणी त्याऐवजी अखंड स्थानबद्धतेसाठी हे शब्द दाखल करण्यात येतील.
(f)(च) कलम १३ मध्ये, बारा महिने या शब्दांऐवजी दोन वर्षे हे शब्द दाखल करण्यात येतील.
(g)(छ) कलम १४ मध्ये, पोटकलम (२) च्या परंतुकास या बारा महिन्यांच्या शब्दांऐवजी दोन वर्षोंच्या हे शब्द दाखल करण्यात येतील.)
———-
१. १९८७ चा अधिनियम २७, कलम ३ अन्वये जादा दाखल करण्यात आले (९-६-१९८७ रोजी व तेव्हापासून).
२. १९८८ चा अधिनियम ४३, कलम २ अन्वये ८ जून १९८८ ऐवजी दाखल करण्यात आले (२६-५-१९८८ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply