राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम ११ :
सल्लागार मंडळाची कार्यपद्धती :
(१) सल्लागार मंडळ, त्याच्यापुढे ठेवण्यात आलेल्या सामग्रीवर विचार केल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी आणखी माहिती समुचित शासनाकडून, किंवा त्या प्रयोजनासाठी समुचित शासनामार्फत बोलवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संबंधित व्यक्तीककडून मागविल्यानंतर, आणि एखाद्या विशिष्ट प्रकरणी त्यास तसे करणे आवश्यक वाटल्यास किंवा आपले म्हणणे ऐकून घेतले जावे अशी संबंधित व्यक्तीची इच्छा असेल तर, तिचे म्हणणे व्यक्तिश: ऐकून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या स्थानबद्धतेच्या दिनांकापासून सात आठवड्यांच्या आत आपला अहवाल समुचित शासनाला सादर करील.
(२) सल्लागार मंडळाच्या अहवालामध्ये संबंधित व्यक्तीच्या स्थानबद्धतेसाठी पुरेसे कारण आहे किंवा नाही याबद्दलचे सल्लागार मंडळाचे मत त्याच्या एका वेगळ्या भागात विनिर्दिष्ट करण्यात येईल.
(३) सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये मतभेद असेल तेव्हा अशा सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांचे मत हे त्या मंडळाचे मत असल्याचे मानण्यात येईल.
(४) ज्या व्यक्तीविरूद्ध स्थानबद्धता आदेश काढण्यात आला असेल ती व्यक्ती, सल्लागार मंडळाकडे प्रकरण विचारार्थ पाठविण्याची संबंधित असलेल्या कोणत्याही बाबींमध्ये कोणत्याही विधी व्यवसायामार्फत उपस्थित होण्यास या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे हक्कदार होणार नाही आणि सल्लागार मंडळाचे मत अहवालाच्या ज्या भागात विनिर्दिष्ट करण्यात आले असेल तो भाग वगळता; सल्लागार मंडळाची कार्यवाही आणि त्याचा अहवाल गोपनीय असेल.