Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ६८-ओ : अपिले :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-ओ :
अपिले :
१) सक्षम प्राधिकरणाने कलम ६८ फ, कलम ६८ आय, कलम ६८ केचे पोटकलम (१) किंवा कलम ६८ एल अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशामुळे व्यथित झालेल्या कलम ६८ ई च्या पोट कलम १ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला तो आदेश त्याच्यावर बजावण्यात आल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत अपील न्यायाधिकरणाकडे अपील करता येईल.
परंतु, अपील करणाऱ्या व्यक्तीस वेळेत अपील सादर करण्यास वाजवी कारणामुळे प्रतिबंध झाला होता याबाबत अपील न्यायाधिकरणाचे समाधान झाल्यास ते उपरोक्त पंचेचाळीस दिवसानंतर परंतु साठ दिवसानंतर नाही अशा वेळी अपील दाखल करून घेऊ शकेल.
२) पोटकलम (१) अन्वये अपील मिळाल्यांनतर अपील न्यायाधिकरणाची तशी इच्छा असल्यास, अपीलकाराला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर व त्या न्यायाधिकरणाला योग्य वाटेल अशी पुढील चौकशी केल्यानंतर ते ज्याविरूद्ध अपील करण्यात आले असेल असा आदेश कायम करू शकेल, त्यात फेरबदल करू शकेल किंवा तो रद्द करू शकेल.
३) अपील न्यायाधिकरणाचे अधिकार व कार्ये अपील न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडून वापरण्यात व पार पाडण्यात येतील.
४) पोटकलम (३) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, या कलमाखालील अपिले त्वरित निकालात काढण्यासाठी अध्यक्षाला आवश्यक वाटते तर दोन दोन सदस्यांचे खंडपीठ स्थापन करू शकेल आणि अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठाला अपील प्राधिकरणाचे अधिकार वापरता येतील आणि त्याची कर्तव्ये पार पाडता येतील.
परंतु, अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठाच्या सदस्यांमध्ये कोणत्याही एका किंवा अनेक मुद्यांवर मतभेद झाल्यास, ज्या एका किंवा अनेक मुद्यांवर त्यांचे मतभेद झाले असतील तो किंवा ते मुद्दे अशा सदस्यांनी नमूद केले पाहिजेत व ते सुनावणीसाठी तिसऱ्या सदस्याकडे (अध्यक्षाने विनिर्दिष्ट करावयाच्या) निर्देशित करण्यात आले पाहिजेत आणि अशा एका किंवा अनेक मुद्यावर त्या सदस्याच्या मतानुसार निर्णय देण्यात आला पाहिजे.
५) अपील न्यायाधिकरणाला आपल्या स्वत:च्या कार्यपद्धतीचे नियमन करता येईल.
६) अपील न्यायाधिकरणाकडे अर्ज करण्यात आल्यावर व विहीत पी भरण्यात आल्यावर न्यायाधिकरण, कोणत्याही अपिलातीतल पक्षकाराला किंवा अशा पक्षकाराने आपल्या वतीने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला कार्यालयीन वेळांमध्ये कोणत्याही वेळी न्यायाधिकरणाचे कोणतेही संबद्ध अभिलेख व नोंदवह्या तपासण्यास आणि त्याच्या कोणत्याही भागाची प्रमाणित प्रत घेण्यास परवानगी घेऊ शकेल.

Exit mobile version