गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५९ :
अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करणे किंवा या अधिनियमाच्या तरतुदींच्या झालेल्या भंगाकडे त्याने काणाडोळा करणे :
१) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये कोणतेही कर्तव्य सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने असे कर्तव्य करण्याचे बंद केले असेल किंवा ते करण्याचे त्याने नाकारले असेल किंवा आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यापासून माघार घेतली असल्यास, त्याने आपल्या कार्यालयीन वरिष्ठाची स्पष्ट लेखी परवानगी घेतली नसल्यास, किंवा तसे करण्यास त्याला अन्य कोणतीही कायदेशीर सबब नसल्यास, तो एक वर्षांपर्यंतच्या कैदेच्या किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.
१.(२) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये कर्तव्ये सोपवण्यात आलेला (कोणताही अधिकारी) किंवा
अ) कोणतीही व्यसनाधीन व्यक्ती किंवा
ब) या अधिनियमान्वये अपराध केला असल्याचा आरोप असलेली अन्य कोणतीही व्यक्ती
यांचा ताबा देण्यात आला असेल अशी अन्य कोणतीही व्यक्ती आणि या अधिनियमाखालील किंवा त्याखाली केलेल्या नियमाखालील किंवा आदेशाखालील कोणत्याही तरतुदीच्या भंगाकडे दुर्लक्ष केल्यास, तो दहा वर्षांपेक्षा कमी मुदतीची नाही परंतु वीस वर्षांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षा होण्यास व तसेच, एक लाख रूपयांपेक्षा कमी नाही. परंतु दोन लाख रूपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या दंड होण्यासही पात्र ठरेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी अधिकारी या शब्दामध्ये रूग्णालयात किंवा कलम ६४ ए अन्वये सरकारकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून व्यसनमुक्तीसाठी उपचार करण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या एखाद्या संस्थेत कामावर ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो.)
३) केंद्र सरकारची किंवा यथास्थिती राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेऊन लेखी तक्रार करण्यात आल्याखेरीज कोणत्याही न्यायालयाने पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खालील कोणत्याही अपराधाची दखल घेता कामा नये.
——-
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम १६ अन्वये मूळ पोटकलमा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
