गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५० :
माणसांची झडती घेता येईल अशा अटी :
१) कलम ४२ अन्वये रीतसर अधिकार देण्यात आलेला एखादा अधिकारी कोणत्याही व्यक्तीची कलम ४१, कलम ४२ किंवा कलम ४३ खाली झडती घेण्याच्या बेतात असेल अशा वेळी त्या व्यक्तीची तशी इच्छा असल्यास, अशा व्यक्तीला गैरवाजवी विलंब न लावता कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्यांपैकी कोणत्याही विभागाच्या सर्वांत जवळ राहणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यासमोर किंवा सर्वांत जवळ असणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमार नेण्यात आले पाहिजे.
२) जर अशी इच्छा व्यक्त करण्यात आली असल्यास, अशा व्यक्तीला पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यासमोर किंवा दंडाधिकाऱ्यासमोर नेण्यात येईपर्यंत झडती घेणारा अधिकारी त्या व्यक्तीला अटक करून ठेवू शकेल.
३) अशा व्यक्तीला ज्याच्यासमोर नेण्यात आले असेल असा राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकारी याला अशा झडतीसाठी कोणतेही वाजवी कारण आढळून आले नसल्यास, तो अशा व्यक्तीची तात्काळ सुटका करू शकेल; परंतु अशी परिस्थिती नसल्यास, त्याने झडती घेण्याचे निदेश दिले पाहिजेत.
४) कोणत्याही महिलेची झडती महिलेखेरजी अन्य कोणीही घेता कामा नये.
१.(५) कलम ४२ नुसार प्राधीकृत केलेल्या अधिकाऱ्यास, एखाद्या व्यक्तीकडे गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा नियंत्रीत पदार्थ किंवा वस्तु किंवा दस्तऐवज असल्याची शाश्वती असेल, मात्र, अशा अधिकाऱ्यास ऐनवेळी राजपत्रीत अधिकाऱ्यास हजर करून त्याची झडती घेणे नसेल तर, तो, राजपत्रीत अधिकाऱ्याच्या उपस्थिती खेरीजही फौजदारी प्रक्रिया संहिते, १९७३ (१९७४ चा २) च्या कलम १०० अन्वये अशी झडती घेऊ शकेल.
६) पोट कलम ५ मध्ये नमूद केलेली झडती घेतली असल्यास अशा अधिकाऱ्याने शाश्वती पटल्याची व झडती घेण्याची आवश्यकता असल्याची कारणे नमूद करून तशा अहवालाची एक प्रत बाहत्तर तासाचे आत त्याच्या निकटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविल.)
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम २२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
