गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३७ :
दखली व बिनदखली अपराध :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही,
अ) या अधिनियमान्वये शिक्षा करण्यास योग्य असलेला प्रत्येक अपराध दखली असेल;
ब) कोणत्याही व्यक्तीस (कलम १९ किंवा कलम २४ किंवा २७ अ किंवा गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या व्यापारी मात्रा संबंधी शिक्षा पात्र ठरेल असा) कोणताही अपराध केल्याचा आरोप असल्यास जामिनावर किंवा व्यक्तिगत बंधपत्रावर सोडण्याच्या बाबतीत –
एक) अशा सोडण्यासाठीच्या अर्जाला विरोध करण्याची वाजवी संधी सरकारी वकिलाला दिल्याशिवाय, आणि
दोन) सरकारी वकिलाने अशा अर्जाला विरोध केला असेल अशा बाबतीत, ती व्यक्ती त्या अपराधाच्या बाबत दोषी नाही आणि तिला जामिनावर सोडले असताना ती कोणताही अपराध करण्याची शक्यता नाही याबाबत त्या न्यायालयाचे समाधान झाले असल्याशिवाय तिला जामिनावर किंवा व्यक्तिगत बंधपत्रावर मुक्त करण्यात येणार नाही.
२) पोटकलम (१) च्या खंड (ब) खाली जामीन मंजूर करण्याच्या संबंधात घालण्यात आलेल्या मर्यादा या फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याखालील जामीन मंजूर करण्याच्या संबंधात त्या वेळी अमलात असणाऱ्या इतर कोणत्याही कायद्याखालील मर्यादांव्यतिरिक्त असतील.
