Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम २ : व्याख्या :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसल्यास,
१.(एक) व्यसनी व्यक्ती याचा अर्थ कोणत्याही गुंगीकारक औषधी द्रव्याचे किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थावर अंवलबून असलेली व्यक्ती, असा आहे.)
दोन) मंडळ याचा अर्थ, केंद्रीय महसूल मंडळे अधिनियम, १९६३ (१९६३ चा ५४) याखाली स्थापना झालेले केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमाशुल्क मंडळ, असा आहे.
तीन) कॅनाबिस (हेम्प – भाग) याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे –
अ)चरस, म्हणजेच कॅनॅपिस वनस्पतीपासून मिळवलेली, वेगळी काढलेली राळ. मग ती कच्ची किवां शुध्द केलेली अशी कोणत्याही स्वरूपाची असो, कॅनॅबिसमध्ये हशीश तेल किंवा द्रव्यरूप हशीश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संहत सिध्दपदार्थांचा आणि राळेचाही समावेश होतो.
ब) गांजा म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीचे फुले आलेले किंवा फळे आलेले शेंडे (बिया आणि पाने यांच्याबरोबर शेंडे नसतील, तर त्या बिया व पाने वगळून) मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत किंवा त्यांना कोणतेही नाव दिलेले असो; आणि
क) कॅनाबिसच्या वरीलपैकी कोणत्याही रूपाचे, कोणत्याही तटस्थ द्रव्यासह किंवा अशा द्रव्यावाचून बनवलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय.
चार) कॅनाबिस वनस्पती याचा अर्थ कॅनॅबिस जातीची कोणतीही वनस्पती असा आहे.
२.(चार-अ) केन्द्र सरकारचे कारखाने म्हणजे केन्द्र सरकारचे कारखाने किंवा कोणत्याही कंपनीच्या मालकीचे कारखाने ज्यामध्ये एकूण शेअर भांडलाचे किमान एक्कावन्न टक्के हिस्सा आहे.)
पाच)कोकासाधित पदार्थ (कोका डिरायव्हेटिव्ह) याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे –
अ) कच्चे कोकेन म्हणजेच कोकेन बनविण्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वापरता येतो असा कोका पानांचा कोणताही अर्क.
ब) इगोनाइन आणि ज्यापासून ते मिळवता येते ते इगोनाइनचे सर्व साधित पदार्थ.
क) कोकेन म्हणजेच बेन्झॉइल इगोनाइनचे मेथिल एस्टर आणि त्याचे क्षार व
ड) ०.१ टक्क्यांपेक्षा अधिक कोकेन असलेले सर्व सिध्दपदार्थ.
सहा)कोकाचे पान याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे –
अ)ज्या पानातून सर्व इगोनाइन, कोकेन आणि इतर कोणतीही इगोनाइन अल्कलॉइड्स काढून टाकण्यात आली आहेत, त्या पानाव्यतिरिक्त कोका वनस्पतीचे पान.
ब) कोणत्याही तटस्थ द्रव्यसह किंवा त्याच्याविना त्याचे कोणतेही मिश्रण, मात्र ०.१ टक्क्यापेक्षा अधिक कोकेन नसलेल्या कोणत्याही सिध्दपदार्थाचा त्यात समावेश होत नाही.
सात) कोका वनस्पती याचा अर्थ एरिथ्रोझायलान जातीच्या कोणत्याही उपजातीची वनस्पती असा आहे.
३.(सात-अ) व्यापारी मात्रा याचा अर्थ, गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थाबाबत केंद्र शासनाने राजपत्रात प्रसिध्द केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असलेली मात्रा.
सात- ब) नियंत्रीत निष्पादन याचा अर्थ, या अधिनियमान्वेच्या गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याची माहीती देण्याकरिता कलम ५० अ नुसार अधिकार प्रदान केलेला किंवा गुंगीकारक औषधीद्रव्ये, मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाचा, नियंत्रीत पदार्थ किंवा निष्पादन करिता पर्यायी पदार्थ भारताच्या भुमीतुन, थेट किंवा सरळमार्गाने गमन करण्यासाठी निष्पादनावर बेकायदेशीर किंवा संशयीत प्रक्रियेच्या नियंत्रणाची प्रत्यक्ष माहीती किंवा अधिपत्य असलेल्या अधिकाऱ्याचे तंत्र.
सात-क) अनुषंगीक कायदा याचा अर्थ, या अधिनियमाच्या तरतुदींशी अनुषंगीक असलेला कोणताही कायदा,)
४.(सात-ड) नियंत्रित पदार्थ याचा अर्थ गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावंर परिणाम करणारे पदार्थ तयार करताना किंवा निर्माण करताना ज्या एखाद्या पदार्थाच्या वापराच्या शक्यतेबद्दल उपलब्ध असलेली माहिती विचारात घेऊन किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारातील तरतुदी विचारात घेऊन केंद्र सरकार तो पदार्थ नियंत्रित पदार्थ असल्याचे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करू शकेल तो कोणताही पदार्थ असा आहे.)
आठ) वाहतुकीची साधने (कन्व्हेयन्स) याचा अर्थ कोणत्याही वर्णनाचे वाहतुकीचे साधन असा असून त्यामध्ये कोणत्याही विमानाचा, वाहनाचा (व्हेइकल) किंवा जहाजाचा समावेश आहे.
५.(आठ-अ) आवश्यक अंमली पदार्थ म्हणजे वैद्यकीय आणि वैज्ञानिक वापरासाठी केंद्र सरकारने अधिसूचित केलेले अंमली पदार्थ;
६.(आठ-ब) अनुचित प्रथा (अवैध व्यापार) याचा अर्थ, गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ याविषयी अनुचित प्रथा म्हणजे –
एक) कोका वनस्पतीची लागवड करणे किंवा कोका वनस्पतीचा कोणताही भाग गोळा करणे.
दोन) अफूच्या झाडाची किंवा कोणत्याही कॅनाबिस वनस्पतीची लागवड करणे.
तीन)गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांचे उत्पादन करण्याच्या, त्यांची निर्मिती करण्याच्या, ते कब्जात ठेवण्याच्या, त्यांची विक्री, खरेदी, वाहतूक करण्याच्या, ते व खारीत ठेवण्याच्या, लपवून ठेवण्याच्या, वापरण्याच्या किंवा त्यांच्या सेवनाच्या, त्यांची आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात, भारतामध्ये आयात, भारताबाहेर निर्यात करण्याच्या किंवा ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात चढवण्याच्या कामात गुंतलेले असणे.
चार) गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांच्या संबंधातील उप-खंड (१) ते (३) मध्ये उल्लेख केलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामांशी संबंधित असणे किंवा,
पाच) उपखंड (१) ते (४) च्या प्रयोजनार्थ कोणतीही कृती करण्याच्या दृष्टीने कोणत्याही जागेचा कब्जा ठेवणे किंवा भाडयाने देणे,
तथापी, या अधिनियमात, किंवा कोणत्याही नियमात किंवा आदेश किंवा कोणत्याही अनुज्ञप्तीतील कोणतीही अट, शर्त किंवा प्रदान केलेले अधिकार यात नमुद केलेल्याचा याला अपवाद असेल, आणि यात –
१)यापूर्वी नमूद केलेल्या कामांपैकी कोणत्याही कामांकरिता प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पैसा पुरवणे,
२)वरिल पैकी कोणत्याही कृतीस पूष्टी किंवा चिथावणी किंवा कट रचने, आणि
३)यापूर्वी नमूद केलेल्या कामांपैकी कोणत्याही कामांत गुंतलेल्या व्यक्तींना आश्रय देणे,
याचा समोवश असेल.)
नऊ) आंतरराष्ट्रीय करार याचा अर्थ –
अ)मार्च १९६१ मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेला गुंगीकारक औषधी द्रव्ये, १९६१ यासंबंधीचा एकेरी करार.
ब)मार्च १९७२ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेला उपखंड (अ)मध्ये नमूद केलेल्या करारात सुधारणा करणारा मूळ मसुदा.
क)फेब्रुवारी १९७१ मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेला, मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ, १९७१ या बाबतचा करार आणि,
ड)या अधिनियमास प्रारंभ झाल्यानंतर भारत सरकार ज्याला अनुमती किंवा रूकार देईल असा गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा नमोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ याबाबतचा अन्य कोणताही आंतरराष्ट्रीय करार किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये दुरूस्ती करणारा प्रोटोकॉल अथवा अन्य दस्तऐवज.
दहा)गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापरांवर परिणाम करणारे पदार्थ याबाबतचा निर्मिती याचा अर्थ –
१)उत्पादनाव्यतिरिक्त ज्या प्रक्रियांच्या साहाय्याने अशी औषधी द्रव्ये किंवा पदार्थ मिळवता येतील त्या सर्व प्रक्रिया.
२)अशी औषधी द्रव्ये किंवा पदार्थ शुध्द करणे.
३)अशा औषधी द्रव्यांचे किंवा पदार्थांचे रूपांतरण; आणि
४)अशा औषधी द्रव्यांच्या किंवा पदार्थांच्या साहाय्याने अथवा अशी औषधी द्रव्ये किंवा पदार्थ असलेला सिध्दपदार्थ (औषधपत्रानुसार औषधशाळेत बनवण्यात येतो त्याव्यतिरिक्त अन्य प्रकारे) तयार करणे.
अकरा) निर्माण केलेले औषधी द्रव्य याचा अर्थ –
अ)सर्व कोकासाधित पदार्थ औषधी उपयोगाची कॅनॅबिस, अफूसाधित पदार्थ आणि अफूच्या गवताचा अर्क असा आहे.
ब) इतर कोणत्याही गुंगीकारक पदार्थाच्या किंवा सिध्दपदार्थाच्या स्वरूपाबाबत उपलब्ध असलेली माहिती किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणताही निर्णय झालेला असल्यास तो निर्णय केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जो निर्माण केलेले औषधी द्रव्ये असल्याचे घोषित करील तो (गुंगीकारक पदार्थ किंवा सिध्दपदार्थ)असा आहे. परंतु त्यात कोणताही गुंगीकारक पदार्थ किंवा सिध्दपदार्थ त्याच्या स्वरूपाबद्दल उपलब्ध असलेली माहिती अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराखाली एखादा निर्णय झालेला असल्यास तो निर्णय, विचारात घेऊन केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निर्माण केलेले औषधी द्रव्य नसल्याचे घोषित करील, त्या गुंगीकारक पदार्थांचा किंवा सिध्दपदार्थांचा समावेश होत नाही.
बारा) औषधी कॅनॅबिस अर्थात औषधी भांग, याचा अर्थ, कॅनॅबिसचा (भांगेचा) कोणताही अर्क किंवा मद्यार्कयुक्त द्रावण (qटक्चर) असा आहे.
तेरा)गुंगीकारक औषधी द्रव्ये आयुक्त याचा अर्थ, कलम ५ नुसार नेमण्यात आलेला गुंगीकारक औषधी द्रव्य आयुक्त असा आहे.
चौदा)गुंगीकारक औषधी द्रव्य याचा अर्थ कोका पान, कॅनॅबिस (भांग) अफू, अफूचे गवत असा असून त्यामध्ये सर्व निर्माण केलेल्या औषधी द्रव्यांचा समावेश आहे.
पंधरा)अफू याचा अर्थ,
अ) अफूच्या बोंडांचा साकळलेला रस आणि
ब) कोणत्याही तटस्थ द्रव्यासह किंवा त्याच्याविना केलेले अफूच्या बोंडांच्या साकळलेल्या रसाचे कोणतेही मिश्रण असा आहे. परंतु त्यात ०.२ टक्क्यांपेक्षा अधिक मॉर्फिन नसलेल्या कोणत्याही सिध्दपदार्थांचा समावेश होत नाही.
सोळा) अफूसाधित पदार्थ याचा अर्थ –
अ) औषधी अफू म्हणजेच भारताचा औषधी गुणधर्म ग्रंथाच्या (फार्माकोपिआ) किंवा केंद्र सरकारने या बाबत अधिसूचित केलेला इतर कोणताही औषधी गुणधर्म ग्रंथाच्या आवश्यकतांनुसार औषधी वापरासाठी स्वीकारण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया जिच्यावर केलेल्या आहेत ती अफू. मग ती भुकटीच्या स्वरूपात किंवा कणीदार किंवा अन्य स्वरूपात किंवा तिचे तटस्थ द्रव्याबरोबर मिश्रण केलेले असो.
ब)सिध्द केलेली अफू म्हणजेच, धूम्रपानाकरिता योग्य होईल अशा अर्कामध्ये अफूचे रूपांतर करण्यासाठी योजलेल्या अनेक प्रक्रिया करून मिळवलेला अफूचा कोणताही सिध्दपदार्थ आणि अफू ओढल्यानंतर उरलेला कोणताही गाळ किंवा इतर अवशेष.
क) फेनॅथ्रीन अल्कलॉईड्स म्हणजेच मार्फिन, कोडीन, थिबेन आणि त्यांचे क्षार.
ड) डायसिटिल मॉर्फिन म्हणजेच डायमॉर्फिन किंवा हेरॉइन म्हणूनही ओळखले जाणारे अल्कलॉइड, त्याचे क्षार आणि,
ई) ०.२ टक्क्यांपेक्षा अधिक मार्फिन असलेले किंवा कोणतेही डायसिटिल मॉर्फिन असलेले सर्व सिध्दपदार्थ;
सतरा) अफूचे झाड याचा अर्थ-
अ) पॅपावर सोम्निफेरम एल या जातीची वनस्पती आणि,
ब) ज्याच्यापासून अफू किंवा कोणतेही फेनॅथ्रिन अल्कलॉइड काढता येते आणि केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी जी अफूचे झाड असल्याचे घोषित करता येईल ती, पॅपावरच्या इतर कोणत्याही जातीची वनस्पती.
अठरा) अफूचे गवत याचा अर्थ अफूच्या झाडोचे कापणी केल्यानंतरचे सर्व भाग (बिया वगळून) मग ते भाग त्यांच्या मूळ स्वरूपात किंवा कापलेल्या भरडलेल्या किंवा चूर्ण केलेल्या स्वरूपात असोत आणि त्यांच्यामधून कोणताही रस काढलेला असो किंवा नसो.
ऐकोणिस) अफूच्या गवताचा अर्क याचा अर्थ-अफूच्या गवताच्या अल्कलॉइड्सचा अर्क काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रकियेमध्ये अफूच्या गवतामधून निघणारा पदार्थ असा आहे.
वीस) सिद्धपदार्थ गुंगीकारक औषधी द्रव्याच्या किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या संबंधात सिद्धपदार्थ याचा अर्थ डोसच्या स्वरूपातील असे कोणतेही एक वा अधिक औषधी द्रव्ये किंवा पदार्थ अथवा अशी एक वा अधिक औषधी द्रव्ये किंवा पदार्थ अंतर्भूत असलेले कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष स्थितीमधील कोणतेही द्रावण किंवा मिश्रण असा आहे.
एकवीस) विहित-याचा अर्थ या अधिनियमाखाली विहित केलेले असा आहे.
बावीस) उत्पादन- याचा अर्थ अफू, अफूचे गवत, कोका पाने किंवा कॅनॅबिस या गोष्टी ज्या वनस्पतीपासून मिळविण्यात येतात त्या वनस्पतीपासून अलग करणे असा आहे.
तेवीस) मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ-याचा अर्थ नैसर्गिक अथवा कृत्रिम असा कोणताही पदार्थ किंवा कोणतेही नैसर्गिक द्रव्य किंवा अनुसूचीमध्ये उल्लेख केलेल्या, मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या यादीत समाविष्ट केलेला असा पदार्थांचा किंवा द्रव्याचा कोणताही क्षार किंवा सिद्धपदार्थ असा आहे.
३.(तेवीस-अ) अल्प मात्रा याचा अर्थ, गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थाबाबत केंद्र शाषनाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या प्रमाणपेक्षा कमी असलेली मात्रा.)
चोवीस) आंतरराज्यीय आयत करणे-याचा अर्थ भारतातील एका राज्यामध्ये किंवा संघ राज्य क्षेत्रामध्ये भारतातील दुसऱ्या राज्यातून किंवा संघ राज्यक्षेत्रातून आणणे असा आहे.
पंचवीस) भारतात आयात करणे- या शब्दप्रयोगात त्याचे व्याकरणिक फेरफार आणि सजातीय शब्दप्रयोग यांच्यासह अर्थ भारताबाहेरील ठिकाणाहून भारतामध्ये आणणे असा असून त्यामध्ये एखादे गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारा पदार्थ ज्या जहाजातून, विमानातून, वाहनातून किंवा वाहतुकीच्या इतर साधानांतून नेला जात असेल त्यामधून तो हलवात भारताबाहेर घेऊन जाण्याच्या उद्देशाने भारताच्या कोणत्याही बंदरामध्ये, विमानतळावर किंवा ठिकाणी आणण्याचा समावेश होतो.
स्पष्टीकरण :
हा खंड आणि सव्वीसावा खंड यांच्या प्रयोजनताकरिता भारत यामध्ये भारताच्या क्षेत्रीय समुद्राचा (टेरिटोरियल वॉटर्स) समावेश होतो.
सव्वीस) भारताबाहेर निर्यात करणे म्हणजे याचा त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह आणि सजातीय शब्दप्रयोगांसह अर्थ भारताबाहेरील ठिकाणी भारतातून घेऊन जाणे असा आहे.
सत्तावीस) आंतरराज्यीय निर्यात करणे याचा अर्थ-भारताच्या एखाद्या राज्यातून किंवा संघराज्य क्षेत्रातून भारताच्या दुसऱ्या राज्यामध्ये किंवा संघराज्य क्षेत्रामध्ये घेऊन जाणे असा आहे.
अठ्ठावीस) वाहतुक करणे याचा अर्थ-त्याच राज्यातील किवा संघराज्य क्षेत्रातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे असा आहे.
३.(अठ्ठावीस -अ) वापर-गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांच्या संबंधात वापर याचा अर्थ व्यक्तिगत सेवनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा वापर असा आहे.)
२९) संहितेतील अर्थ- या अधिनियमामध्ये वापरलेले आणि व्याख्या न केलेले परंतु फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना त्या संहितेमध्ये त्यांना अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ असतील.
स्पष्टीकरण :
खंड (५), (६), (१५) आणि (१६) यांच्या प्रयोजनाकरिता, द्रवरूप सिद्धपदार्थांच्या बाबतीतील टक्केवारी पुढील प्रकारे मोजण्यात येईल –
सिद्धपदार्थाच्या प्रत्येक शंभर मिलिलीटरमध्ये एक टक्का पदार्थ असलेला असा सिद्धपदार्थ म्हणजे घनरूप असल्यास एक ग्रॅम पदार्थ असलेला सिद्धपदार्थ किंवा द्रवरूप असल्यास एक मिलीलीटर पदार्थ असलेला सिद्धपदार्थ आणि या प्रमाणात कोणत्याही अधिक किंवा कमी टक्केवारीची मोजणी करण्यात येईल.
परंतु द्रवरूप सिद्धपदार्थांमधील टक्केवारी मोजण्याच्या पद्धतींमध्ये होत असलेल्या सुधारणा विचारात घेऊन केंद्र सरकार अशा मोजणीसाठी त्याला योग्य वाटेल असे इतर कोणतेही तत्त्व नियमांद्वारे नेमून देऊ शकेल.
——–
१. सन २००१ चा सुधारणा अधिनियम क्रं. ९ अन्वये सुधारणा करण्यात आली.
२. सन २०१४ चा अधिनियम क्रमांक १४ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. सन २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम ३ अन्वये (सात) (अ) ऐवजी (सात) (ड) असा नव्याने क्रमांक दिला यापूर्वी १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट केला होता.
५. सन २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आला.
६. सन २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम २ अन्वये (आठ) (अ) ऐवजी (आठ) (ब) असा नव्याने क्रमांक दिला यापूर्वी १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आला.

Exit mobile version