मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५१ :
भाडे-खरेदी करार, इ. याच्या अधीनतेने मोटार वाहनाविषयी विशेष तरतूदी :
१) भाडे-खरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण करार (या कलमात यापुढे ज्याचा सदर करार असा निर्देश करण्यात आला आहे) याखाली धारण केलेल्या मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला असेल, अशा बाबतीत नोंदणी प्राधिकरण, सदर करार अस्तित्वात असल्याबद्दल नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंदणी करील.
२) या प्रकरणाखाली नोंदणी करण्यात आलेल्या कोणत्याही मोटार वाहनाचे हस्तांतरण करण्यात आले असेल आणि हस्तांतरितीने कोणत्याही व्यक्तीबरोबर सदर करार केला असेल, अशा बाबतीत १.((अखेरचे) नोंदणी प्राधिकरण), सदर करारातील पक्षांकडून, केंद्र सरकार विहित करील अशा नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यांनतर, सदर करार अस्तित्वात असल्याबद्दल नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंद करील २.(आणि अखेरचे नोंदणी प्राधिकरण हे मूळ नोंदणी प्राधिकरण नसेल, तर मूळ नोंदणी प्राधिकरणास यासंबंधातील माहिती कळवील.)
३) पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) अन्वये केलेली कोणतीही नोंद केंद्र सरकारकडून विहित करण्यात येईल, अशा नमुन्यातील अर्ज मिळाल्यानंतर संबंधित पक्षांनी उक्त करार समाप्त केल्याचा पुरावा मिळाल्यास ३.(अखेरचे) नोंदणी प्राधिकरण) रद्द करू शकेल. ४.(आणि अखेरचे नोंदणी प्राधिकरण हे मूळ नोंदणी प्राधिकरण हे मूळ नोंदणी प्राधिकरण नसल्यास मूळ नोंदणी प्राधिकरणास यासंबंधातील माहिती कळवील.)
४) सदर कराराखाली धारण करण्यात आलेल्या कोणत्याही मोटार वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणाच्या संबंधातील कोणतीही नोंद, नोंदलेल्या मालकाने उक्त करार ज्या व्यक्तीबरोबर केला ती व्यक्ती म्हणून नोंदणी प्रमाणपत्रात तिचे नाव विनिर्दिष्ट करण्यात आले असेल, अशा व्यक्तीच्या लेखी अनुमतीशिवाय, नोंदणी प्रमाणपत्रात नमूद करण्यात येणार नाही.
५) नोंदलेल्या मालकाचा जिच्याबरोबर सदर करार केला ती व्यक्ती म्हणून नोंदणी प्रमाणपत्रामध्ये जिचे नाव विनिर्दिष्ट करण्यात आले आहे अशा व्यक्तीने, नोंदलेल्या मालकाच्या कसुरीमुळे, उक्त करराच्या तरतुदींखाली ५.(नोंदलेल्या मालकाकडून) आपण वाहनाचा ताबा घेतलेला आहे आणि नोंदलेला मालक नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यास नकार देत आहे किंवा फरार झाला आहे याविषयी नोंदणी अधिकाऱ्याची खात्री करून दिल्यास, असे प्राधिकरण, नोंदलेल्या मालकास (नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या त्याच्या पत्त्यावर पोचदेय नोंदणी डाकेने त्याला नोटीस पाठवून) त्याच्या इच्छेस येईल त्याप्रमाणे अभिवेदन करण्याची संधी दिल्यानंतर आणि त्याच्यापुढे नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसले, तरीदेखील असे प्रमाणपत्र रद्द करू शकेल आणि नोंदलेल्या मालकाने ज्याच्याबरोबर सदर करार केला त्या व्यक्तीच्या नावे नवीन नोंदणीपत्र देऊ शकेल :
परंतु, अशा व्यक्तीने विहित शुल्काच्या भरणा केल्याशिवाय मोटार वाहनाच्या बाबतीत नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
परंतु आणखी असे की, परिवहन वाहनाशिवाय अन्य वाहनाच्या संबंधात देण्यात आलेले नवीन नोंदणी प्रमाणपत्र, या पोट-कलमानुसार रद्द केलेले प्रमाणपत्र जेवढ्या उर्वरित कालावधीसाठी अमलात राहिले असते तेवढ्या कालावधीपुरतेच विधिग्राह्य राहील.
६) नोंदलेला मालक, कलम ८१ अन्वये परवान्याचे नवीकरण करण्यासाठी किंवा कलम ४१, पोट-कलम (१४) अन्वये, नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळण्यासाठी किंवा कलम ४७ अन्वये नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्यासाठी ६.(किंवा दुसऱ्या राज्यामध्ये वाहन हलविण्यासाठी किंवा वाहनाच्या हस्तांतरणाच्या वेळी वाहन एका वर्गातून दुसऱ्या वर्गात बदलण्यासाठी किंवा कलम ४८ अन्वये ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी, किंवा कलम ४९ अन्वये निवासाच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदलासाठी किंवा कलम ५२ अन्वये वाहनामध्ये फेरबदल करण्यासाठी ) समुचित प्राधिकरणाकडे अर्ज करण्यापूर्वी, नोंदलेल्या मालकाने, त्याने ज्याच्याबरोबर उक्त केलेला आहे, अशा व्यक्तीकडे (अशा व्यक्तीचा यानंतर या कलमामध्ये वित्तदाता असा निर्देश करण्यात आला आहे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यसाठी ( या कलमामध्ये यानंतर ज्याचा प्रमाणपत्र म्हणून निर्देश करण्यात आला आहे) अर्ज करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या व पोट-कलम (८) व (९) यांच्या प्रयोजनांसाठी, कोणत्याही परवान्याच्या संबंधात,समुचित प्राधिकरण याचा अर्थ, अशा परवान्याचे नवीकरण करण्यासाठी या अधिनियमाद्वारे प्राधिकृत केलेले प्राधिकरण, असा आहे आणि, नोंदणीच्या संबंधात याचा अर्थ, या अधिनियमान्वये नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत देण्यासाठी किंवा नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्यासाठी अधिकृत करण्यात आलेले प्राधिकरण, असा आहे.
७) पोट-कलम (६) खालील अर्ज मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत, वित्तदाता, ज्यासाठी अर्ज करण्यात आला आहे ते प्रमाणपत्र देऊ शकेल किंवा अर्जदाराला लेखी कळविण्यात आलेल्या कारणांस्तव नाकारू शकेल, आणि वित्तदात्याने प्रमाणपत्र देण्यात आणि तसेच प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यामागची कारणे कळविण्यात कसूर केल्यास, ज्यासाठी अर्ज करण्यात आला ते प्रमाणपत्र वित्तदात्याने दिले असल्याचे मानण्यात येईल.
८) नोंदलेला मालक, समुचित प्राधिकरणाकडे, कलम ८१ खालील कोणत्याही परवान्याचे नवीकरण करण्यासाठी, किंवा कलम ४१ पोट-कलम (१४) खाली नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळण्यासाठी अर्ज करतेवेळी अशा अर्जासोबत, कलम (७) खाली कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास असे प्रमाणपत्र, असे कोणतेही प्राप्त केले नसल्यास, त्या पोट-कलमाखाली वित्तदात्याकडून मिळालेली माहिती, किंवा यथास्थिती त्या पोट-कलमामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सात दिवसांच्या कालावधीमध्ये वित्तदात्याकडून त्यास काहीही कळविण्यात आले नाही, अशा अशायाचे प्रतिज्ञापन, सादर करील.
९) कोणत्याही परवान्याचे नवीकरण करण्यासाठी किंवा नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळण्याबाबत किंवा उक्त करारखाली धारण केलेल्या वाहनाच्या संबंधात नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्यासाठी अर्ज मिळाल्यानंतर, समुचित प्राधिकरण, या अधिनियमातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने-
(a)क) अ) ज्यासाठी अर्ज केलेला आहे असे प्रमाणपत्र देण्यास वित्तदात्याने नकार दिला असेल, अशा बाबतीत अर्जदाराला सुनावणीची संधी दिल्यानंतर, एकतर-
एक) परवान्याचे नवीकरण करील किंवा करण्याचे नाकारील, किंवा
दोन) नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत देईल किंवा देण्याचे नाकारील, किंवा
तीन) नवीन नोंदणी चिन्ह नेमून देईल किंवा नेमूण देणार नाही.
(b)ख) ब) अन्य कोणत्याही बाबतीत,
एक) परवान्याचे नवीकरण करील, किंवा
दोन) नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत देईल, किंवा
तीन) नवीन नोंदणी चिन्ह नेमून देईल.
१०)(a) क) अ) भाडे-खरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण यावरील मोटारवाहन, किंवा
(b)ख) ब) पोट-कलम (३) याखाली रद्द झालेली नोंद, किंवा
(c)ग) क) मोटार वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणाविषयीची नोंद करणे, किंवा
(d)घ) ड) मोटार वाहनातील कोणताही फेरबदल, किंवा
(e)ड) ई) मोटार वाहनाच्या नोंदणीचे निलंबन किंवा ती रद्द करणे, किंवा
(f)च) फ) पत्त्यातील बदल,
यासंबंधात नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंद करणारे नोंदणी प्राधिकरण, अशी नोंद घेतली गेली आहे, याविषयी वित्तदात्याला ७.(पोचदेय नोंदणीकृत डाकेने) कळवील.
८.(११) नवीन वाहनाची नोंदणी करणारे, किंवा नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत देणारे, किंवा ना-हरकत प्रमाणपत्र किंवा तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र देणारे, किंवा क्षमता प्रमाणपत्र देणारे किंवा त्याचे नवीकरण करणारे, किंवा परवान्यामध्ये आधीच्या नोंदीच्या जागी दुसऱ्या मोटार वाहनाच्या संबंधातील नोंदी दाखल करणारे नोंदणी प्राधिकरण, अशा व्यवहाराविषयी वित्तदात्याला कळवील.
१२) नोंदणी प्राधिकरण हे मूळ नोंदणी प्राधिकरण नसेल, अशा बाबतीत पोट कलमाला किंवा पोट-कलम (२) खाली नोंद करतेवेळी, किंवा पोट-कलम (३) खाली उक्त नोंद रद्द करतेवेळी, किंवा पोट-कलम (५) खाली नवीन नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी, याविषयी मूळ नोंदणी प्राधिकरणास कळवील.)
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
८. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.