मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५० :
मालकीचे हस्तांतरण:
या प्रकरणाखाली नोंदणी केलेल्या कोणत्याही मोटार वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण करण्यात आले असले तर-
(a)क) अ) हस्तांतरक (ट्रान्सफरर)
एक) त्याच राज्यामध्ये नोंदणी झालेल्या वाहनाच्या बाबतीत, ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये हस्तांतरण घडून यावयाचे असेल, त्या नोंदणी प्राधिकरणास हस्तांतरण झाल्यापासून चौदा दिवसांच्या आत केंद्र सरकारकडून विहित करण्यात येईल, अश नमुन्यात व अशा पद्धतीने हस्तांरणाची बातमी अशा दस्तऐवजासह कळवील आणि त्याच वेळी उक्त माहितीची एक प्रत हस्तांतरितीकडे पाठवील.
दोन) वाहनाची नोंदणी राज्याबाहेर झाली असेल, अशाबाबतीत, अशा हस्तांतरणाच्या तारखेपासून पंचेचाळीस दिवसांच्या आत, पोट-कलम (एक) मध्ये निर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्राधिकरणाकडे-
(A)क) अ) कलम ४८ खाली मिळविलेले ना-हरकत प्रमाणपत्र; किंवा
(B)ख) ब) कोणतेही असे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले नसेल अशा बाबतीत-
एक) कलम ४८ च्या पोट-कलम (२) अन्वये मिळविलेले पावती; किंवा
दोन) हस्तांतरकाने आपला या बाबतीतील अर्ज, कलम ४८ मध्ये निर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणीकृत पोचदेय डाकेने पाठविला असल्यास, डाक कायालयाकडून त्याला मिळालेली पोचपावती, पाठवील.
तसेच, त्यासोबत, असे प्रमाणपत्र देण्याचे नाकारणाऱ्या किंवा ज्याच्या अधीनतेने असे प्रमाणपत्र देता येईल, अशा कोणत्याही निदेशांचे अनुपालन करणे आवश्यक करणाऱ्या अशा प्रधिकरणाकडून आपणास काहीही कळविण्यात आले नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापन करून देईल.
(b)ख) ब) हस्तांतरिती, हस्तांतरण करण्यात आल्यापासून तीस दिवसांच्या आत, वाहन सर्वसाधारणपणे जेथे ठेवण्यात येते, अशी त्याची राहण्याची जागा किंवा यथास्थिति, त्याची व्यवसायाची जागा ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये येते त्या नांदणी प्राधिकरणाला हस्तांरणाविषयी कळवील आणि मालकीच्या हस्तांतरणाविषयीच्या तपशिलाची नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंद करता यावी यासाठी, नोंदणी प्रमाणपत्र, तसेच विहित शुल्क आणि हस्तांतरकाडून त्याला मिळालेल्या अहवालाची प्रत नोंदणी प्राधिकरणाकडे पाठवील.
२) जेव्हा-
(a)क) अ) मोटार वाहन ज्याच्या नावाने नोंदविण्यात आले आहे अशा व्यक्तीचे निधन होते, किंवा
(b)ख) ब) शासनाने किंवा त्याच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर लिलावामध्ये मोटार वाहन खरेदी करण्यात किंवा संपादन करण्यात आले असेल,
तेव्हा, वाहनाचा कब्जा त्यानंतर ज्याच्याकडे गेला आहे किंवा यथास्थिति, मोटार वाहनाची जिने खरेदी किंवा संपादन केलेले आहे, अशी व्यक्ती वाहनाच्या मालकीचे त्याच्या नावाने हस्तांतरण करण्याच्या प्रयोजनासाठी, वाहन सर्वसाधारणपणे जेथे ठेवण्यात येते अशी त्याच्या निवासाची जागा किंवा व्यवसायाचे स्थान ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये येते अशा नोंदणी प्राधिकरणाकडे, केंद्र सरकार विहित करील अशा पद्धतीने त्या सोबतच्या शुल्कासह व अशा कालावधीच्या आत अर्ज करील.
३) हस्तांतरकाने किंवा हस्तांतरितीने, पोट-कलम (१) चा खंड (अ) किंवा यथास्थिति, खंड (ब) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीच्या आत हस्तांतरणाचे वृत्त नोंदणी प्राधिकरणाला कळविण्यात कसूर केल्यास किंवा पोट-कलम (२) अन्वये अर्ज करणे आवश्यक आहे अशा व्यक्तीने (यांनतर या कलमामध्ये जिचा अन्य व्यक्ती असा निर्देश केला आहे) विहित कालावधीच्या आत अर्ज करण्यात कसूर केल्यास, नोंदणी प्राधिकरण, प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन, हस्तांतरकाला किंवा हस्तांतरितीला किंवा यथास्थिति, अन्य व्यक्तिला, कलम १७७ खाली त्याच्याविरूद्ध करता येईल, अशा कोणत्याही कारवाईऐवजी, पोट-कलम (५) मध्ये विहित करण्यात येईल, त्याप्रमाणे शंभर रूपयांपेक्षा अधिक होणार नाही एवढी रक्कम भरणे आवश्यक करू शकेल;
परंतु, हस्तांतरक किंवा हस्तांतरिती किंवा यथास्थिति, अन्य व्यक्ती यांच्याविरूद्ध कलम १७७ खालील कारवाई, तो सदर रक्कम भरण्यात कसूर करीत असेल, अशा बाबतीतच करण्यात येईल.
४) पोट-कलम (३) खालील रक्कम त्या व्यक्तीने भरली असेल, अशा बाबतीत तिच्याविरूद्ध कलम १७७ खालील कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
५) पोट-कलम (३) च्या प्रयोजनांसाठी राज्य शासनास, हस्तांतरकाने किंवा हस्तांतरितीने मोटार वाहनाच्या हस्तांतरणाचे वृत्त कळविण्यात किंवा अन्य व्यक्तीने पोट-कलम (२) अन्वये अर्ज करण्यात केलेल्या विलंबाचा कालावधी लक्षात घेऊन वेगवेगळ्या रकमा विहित करता येतील.
६) पोट-कलम (१) खालील अहवाला किंवा पोट-कलम (२) खालील अर्ज मिळाल्यानंतर, नोंदणी प्राधिकरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये मालकीच्या हस्तांतरणाची नोंद करवून घेईल.
७) अशी कोणतीही नोंद करणारे नोंदणी प्राधिकरण, ते मूळ नोंदणी प्राधिकरण नसेल, तर मूळ नोंदणी प्राधिकरणास मालकीच्या हस्तांरणाविषयी कळवील.