Mv act 1988 कलम ४८ : ना-हरकत प्रमाणपत्र :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४८ :
ना-हरकत प्रमाणपत्र :
मोटार वाहनाचा मालक, कलम ४७, पोट-कलम (१) अन्वये नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्याविषयी अर्ज करीत असेल, किंवा त्या वाहनाची ज्या राज्यामध्ये नोंदणी झाली त्याखेरीज अन्य राज्यामध्ये मोटार वाहनाचे हस्तांतरण करावयाचे असेल अशा बाबतीत, कलम ५० च्या पोट-कलम (१) अन्वये अशा वाहनाचे हस्तांतरण करणाऱ्या हस्तांतरकाला केंद्र सरकाल विहित अशा नमुन्यामध्ये व अशा पद्धतीने वाहनाला नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्यासाठी किंवा यथास्थिति, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये मालकीच्या हस्तांतरणाचा तपशील नमूद करण्यासाठी त्या नोंदणी प्राधिकरणाची कोणतीही हरकत नाही अशा आशयाचे (या कलमात ज्याचा यांनतर ना-हरकत प्रमाणपत्र असा निर्देश केला आहे ते) प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल.
२) नोंदणी प्राधिकरण, पोट-कलम (१) खालील अर्ज प्राप्त झाल्यानंतर, केंद्र सरकारद्वारे विहित करण्यात येईल अशा नमुन्यातील पावती देईल.
३) पोट-कलम (१) खालील अर्ज मिळाल्यानंतर, नोंदणी प्राधिकरण, त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यांनतर व त्यास योग्य वाटतील अशा निदेशांचे पालन करणे अर्जदाराला आवश्यक केल्यानंतर आणि असा अर्ज मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत, अर्जदाराला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे की, नाकारण्यात आले आहे ते लेखी आदेशाद्वारे कळवील :
परंतु, ना-हरकत प्रमाणपत्र नाकारावयाचे झाल्यास, नोंदणी प्राधिकरण त्याविषयीची लेखी कारणष नमूद केल्याशिवाय व त्याची एक प्रत अर्जदाराला पाठविल्याशिवाय, ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारणार नाही.
४) पोट-कलम (३) मध्ये उल्लेखिलेल्या तीस दिवसांच्या कलावधीत नोंदणी प्राधिकरणाने ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारले नाही किंवा अर्जदाराला तसा नकार कळवला नाही तर, नोंदणी प्राधिकरणाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्याचे मानण्यात येईल.
५) ना-हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी किंवा ते नाकारण्यापूर्वी, नोंदणी प्राधिकरण, संबंधित मोटार वाहनाच्या चोरीसंबंधी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही किंवा त्याविषयीचे कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही असा लेखी अहवाल पोलिसांकडून मिळवील, त्या मोटार वाहनाच्या संबंधातील पथकरासह सर्व देणी भागविण्यात आली आहेत या विषयी खात्री करून घेईल आणि केंद्र सरकारद्वारे विहित करण्यात येतील अशा अन्य बाबीदेखील विचारात घेईल.
१.(६) त्याचप्रमाणे, वाहनाचा मालक, शक्य तेवढ्या लवकर, त्याच्या वाहनाची चारी व चोरीची तक्रार ज्या पोलीस ठाण्यात नोंदवील त्याचे नाव याविषयी नोंदणी प्राधिकरणास लेखी कळवील, आणि नोंदणी प्राधिकरण, ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी, मालकी हस्तांतरण किंवा नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळणे याविषयीचा कोणताही अर्ज निकालात काढतेवेळी असा अहवाला विचारात घेईल.)
———-
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply