Mv act 1988 कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४७ :
वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे :
१) एका राज्यामध्ये नोंदणी करण्यात आलेले मोटार वाहन, बारा महिन्यांपेक्षा अधिक होईल, एवढ्या कालावधीसाठी अन्य राज्यामध्ये ठेवण्यात आले असेल, अशा बाबतीत त्या वाहनाचा मालक, केंद्र सरकारकडून विहित करण्यात येईल अशा कालावधीच्या आत व असा तपशील अंतर्भूत असलेल्या अशा नमुन्यामध्ये, त्या वेळी ते वाहन ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये असेल, त्या नोंदणी प्राधिकरणाकडे, नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्यासाठी अर्ज करील आणि त्या नोंदणी प्राधिकरणास नोंदणी प्रमाणपत्र सादर करील :
परंतु, या पोट-कलमाखालील अर्जासोबत पुढील बाबी सादर करण्यात येतील-
एक) कलम ४८ खाली प्राप्त केलेले ना-हरकत प्रमाणपत्र, किंवा
दोन) ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले नसेल अशा बाबतीत-
(a)क) अ) कलम ४८, पोट-कलम (२) नुसार प्राप्त केलेली पावती, किंवा
(b)ख) ब) कलम ४८ मध्ये निर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्राधिकरणाकडे वाहनाच्या मालकाने पोच देय नोंदणीकृत टपालाने याबाबतीतील अर्ज पाठविला असल्यास, त्यास मिळालेली डाक पोचपावती, जोडली पाहिजे व तसेच, असे प्रमाणपत्र नाकारणाऱ्या किंवा ज्याच्या अधीनतेने असे प्रमाणपत्र देता येईल, अशा कोणत्याही निदेशांचे अनुपालन करणे आवश्यक करणाऱ्या अशा प्राधिकरणाकडून त्यास काहीही कळविण्यात आलेले नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापनदेखील त्याने सादर केले पाहिजे;
परंतु आणखी असे की, भाडे-खरेदी, भाडेपट्टा, किंवा तारणगहाण कराराखाली मोटारवाहन ठेवले असेल अशा बाबतीत, या पोट-कलमाखालील अर्जासोबत, ज्या व्यक्तीबरोबर असा करार करण्यात आला असेल, तिचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडण्यात येईल आणि ज्या व्यक्तीबरोबर असा करार करण्यात आला त्याच्याकडून असे प्रमाणपत्र मिळविण्या-संबंधातील कलम ५१ मधील तरतुदी, शक्य तेथवर, लागू होतील.
२) पोट-कलम (१) खालील अर्ज ज्याच्याकडे करण्यात आला असेल ते नोंदणी प्राधिकरण, कलम ६२ खाली त्याच्याकडे कोणतीही विवरणपत्रे आली असल्यास, त्याला योग्य वाटेल अशा प्रकारे त्यांची पडताळणी केल्यांनतर कलम ४१ च्या पोट-कलम (६) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, प्रदर्शित करण्यासाठी व त्यानंतर वाहनावर दाखविण्यासाठी, वाहनास एक नोंदणी चिन्ह नेमून देईल आणि त्या चिन्हाची, नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास परत करण्यापूर्वी त्यावर नोंद करील आणि त्याने त्या वाहनाची यापूर्वी नोंदणी केली होती; त्या नोंदणी प्राधिकरणाशी संपर्क साधून, त्या नोंदणी प्राधिकरणाच्या अभिलेखातून अशा वाहनाची नोंदणी आपल्या अभिलेखामध्ये हस्तांतरित करण्याची व्यवस्था करील.
३) एखादे मोटार वाहन, भाडेखरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण कराराने ठेवले असेल, अशा बाबतीत, नोंदणी प्राधिकरण त्या वाहनास पोट-कलम (२) खाली नोंदणी चिन्ह नेमून दिल्यानंतर, नोंदणी केलेल्या मालकाने जिच्याबरोबर भाडेखरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण करार केला असल्याचे नोंदणी प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्ट केले असेल त्या व्यक्तीला (नोंदणी प्रमाणपत्रात अशा व्यक्तीचा जो पत्ता दिला असेल त्या पत्त्यावर पोचदेय नोंदणी डाकेने नोटीस पाठवून) सदर नोंदणी चिन्ह त्या वाहनास देण्यात आल्याचे कळवील.
४) राज्य शासनास, त्या राज्यात नोंदणी न झालेले मोटार वाहन त्या राज्यामध्ये आणण्यात आले असेल किंवा त्या वेळेपुरते ते त्या राज्यात असेल, अशा मोटार वाहनाच्या मालकाने मोटार वाहनाच्या किंवा त्याच्या नोंदणीच्या संबंधात विहित करण्यात येईल अशी माहिती, राज्यात विहित प्राधिकरणाला पुरविणे आवश्यक करण्याबद्दल कलम ६५ अन्वये नियम करता येतील.
५) मालकाने विहित कालावधीमध्ये अर्ज करण्यात कसूर केल्यास, नोंदणी प्राधिकरण, त्या प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन, त्याच्याविरूद्ध कलम १७७ अन्वये करता येईल, अशा कोणत्याही कार्यवाहीऐवजी, पोट-कलम (७) मध्ये विहित करण्यात येईल अशी शंभर रूपयांपेक्षा अधिक होणार नाही एवढी रक्कम भरण्यास भाग पाडू शकेल:
परंतु, कलम १७७ खालील कारवाई, सदर रक्कम भरण्यात कसूर करील अशा मालकाविरूद्ध करण्यात येईल.
६) मालकाने पोट-कलम (५) खालील रक्कम भरली असेल. अशा बाबतीत त्याच्याविरूद्ध कलम १७७ खालील कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
७) पोट-कलम (५) च्या प्रयोजनांसाठी, राज्य शासनाला, पोट-कलम(१) अन्वये अर्ज करण्यात मालकाने केलेला विलंब कालावधी विचारात घेऊन निरनिराळ्या रकमा विहित करता येतील.

Leave a Reply