मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३४ :
लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :
१) चालकाचे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीने, चालक या नात्याने त्याने पूर्वी केलेल्या वर्तणुकीमुळे, असे लायसन धारण करण्यास किंवा ते प्राप्त करण्यास त्यास अनर्ह ठरविणे आवश्यक आहे असे कोणत्याही लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे मत झाल्यास, त्यास अभिलिखित करावयाच्या कारणांसाठी, एक वर्षापेक्षा अधिक नाही एवढ्या विनिर्दिष्ट मुदतीसाठी, त्या व्यक्तीला चालकाचे लायसन धारण करण्यासाठी किंवा ते प्राप्त करण्यासाठी अनर्ह ठरविणारा आदेश काढता येईल :
परंतु, लायसनधारकास अनर्ह ठरविण्यापूर्वी, लायसन देणारे प्राधिकरण असे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीला सुनावणीची वाजवी संधी देईल.
२) कोणताही असा आदेश जारी केल्यानंतर, चालकाचे लायसन धारण करणारी व्यक्ती, जर त्याने लायसन यापूर्वीच स्वाधीन केले नसल्यास ते, आदेश काढणाऱ्या प्राधिकरणाच्या तात्काळ स्वाधीन करील आणि ते प्राधिकरण, त्याची अनर्हता समाप्त होईपर्यंत किंवा ती दूर करण्यात येईपर्यंत आपल्याकडे बाळगील.
३) या कलमाखाली, धारकाला वाहकाचे लायसन धारण करण्यास अनर्ह ठरविणारे प्राधिकरण हे, ज्याने लायसन दिले ते प्राधिकरण नसेल, अशा बाबतीत ज्याने ते लायसन दिले त्या प्राधिकरणास अशा अनर्हतेची माहिती कळवील.
४) पोट-कलम (१) अन्वये काढलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, असा आदेश त्याच्यावर बजावण्यात आल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत विहित प्राधिकरणाकडे अपील करता येईल आणि ते प्राधिकरण, अशा व्यक्तीला आणि आदेश काढला त्या प्राधिकरणाला सुनावणीची संधी दिल्यानंतर त्या अपिलावर निर्णय देईल आणि अपील प्राधिकरणाचा निर्णय ज्याने आदेश काढला त्या प्राधिकरणावर बंधनकारक राहील.