मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३० :
वाहकाच्या (कंडक्टर) लायसनचे प्रदान :
१) राज्य शासनास विहित करता येईल अशी किमान शैक्षणिक अर्हता असलेल्या आणि जिला कलम ३१ च्या पोटकलम (१) अन्वये अनर्ह ठरविण्यात आलेले नाही आणि वाहकाचे लायसन धारण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जिला त्याकाळी अनर्ह ठरविण्यात आलेले नाही अशा कोणत्याही व्यक्तीला, तो सर्वसाधारणपणे राहत असेल किंवा आपला व्यवसाय चालवीत असेल, अशा क्षेत्रामध्ये अधिकारिता असलेल्या लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे त्याला वाहकाचे लायसन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.
२) पोट-कलम (१) खालील प्रत्येक अर्ज विहित करण्यात येईल अशा नमुन्यात करण्यात येईल व त्यात विहित करण्यात येईल अशी माहिती देण्यात येईल.
३) वाहकाच्या लायसनच्या प्रत्येक अर्जसोबत नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीची सही असलेला, विहित करण्यात येईल अशा नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात येईल आणि त्यासोबत अर्जदाराच्या अलीकडे काढलेल्या छायाचित्राच्या दोन स्पष्ट प्रती जोडण्यात येतील.
४) या प्रकरणाखाली देण्यात आलेले वाहकाचे लायसन विहित करण्यात येईल अशा नमुन्यातील असेल व त्यात विहित करण्यात येईल अशा माहितीचा अंतर्भाव असेल व ते ज्या राज्यामध्ये देण्यात आले असेल त्या संपूर्ण राज्यभर प्रभावी असेल.
५) वाहकाच्या लायसनसाठी व त्याच्या प्रत्येक नवीकरणासाठी असलेले शुल्क चालकाच्या लायसनच्या शुल्क चालकाच्या लायसनच्या शुल्काच्या अध्र्याएवढे असेल.