मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २४ :
पृष्ठांकन :
१) अपात्र ठरविण्यात आलेल्या व्यक्तीने कोणतेही चालकाचे लायसन धारण केलेले असल्यास, अपात्रता आदेश काढणारे न्यायालय किंवा प्राधिकरण त्या लायसनवर अपात्रता आदेशाचे आणि ज्याच्या संबंधात अपात्रता आदेश काढण्यात आला असेल, त्या दोषसिद्धीचे तपशील पृष्ठांकित करील आणि अपात्रता आदेशामध्ये कलम २३ पोट-कलम (३) खाली करण्यात आलेल्या रद्द करण्यासंबंधीचे किंवा फेरफारासंबंधीचे तपशीलही त्याचप्रमाणे पृष्ठांकित करण्यात येतील.
२) केंद्र शासनाकडून विहित करण्यात आल्याप्रमाणे, या अधिनियमाखालील एखाद्या अपराधाबद्दल कोणत्याही व्यतीला दोषी ठरवील, असे न्यायालय या अधिनियमाची उद्दिष्टे लक्षात घेऊन, अशा दोषी ठरविण्याच्या संबंधात अपात्रता आदेश काढण्यात आलेला वा नसो; अशा दोषसिद्धीबाबतचे तपशील दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीने धारण केलेल्या चालकाच्या लायसनवर पृष्ठांकित करील किंवा अशा प्रकारे पृष्ठांकित करण्याची व्यवस्था करील.
३) पोट-कलम (२) अन्वये विहित करण्यात आलेल्या अपराधाचा आरोप करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहताना तिथे चालकाचे लायसन तिच्या ताब्यात असल्यास ते सोबत आणले पाहिजे.
४) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले असेल आणि तिला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा देण्यात आली असेल अशा बाबतीत, शिक्षा देणारे न्यायालय, संबंधित व्यक्तीच्या चालकाच्या लायसनवर अशा शिक्षेसंबंधीची वस्तुस्थिती पृष्ठांकित करील आणि खटला भरणारे प्राधिकरण अशा पृष्ठांकनासंबंधीची वस्तुस्थिती चालकाचे लायसन देणाऱ्या किंवा त्याचे शेवटी नवीकरण करणाऱ्या प्राधिकरणाला कळवील.
५) चालकाच्या लायसनवर कोणत्याही न्यायालयाने पृष्ठांकन केले असेल किंवा असे पृष्ठांकन करण्याची व्यवस्था केली असेल, अशा बाबतीत असे न्यायालय, त्या पृष्ठांकनाचे तपशील चालकाचे लायसन देणाऱ्या किंवा त्याचे शेवटी नवीकरण करणाऱ्या लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे पाठवील.
६) दोषसिद्धी किंवा ज्याने चालकाच्या लायसनवर पृष्ठांकन केले असेल, अशा न्यायालयाचा आदेश या विरूद्धच्या अपीलामध्ये अपील न्यायालय दोषसिद्धीमध्ये किंवा आदेशामध्ये फेरबदल करील किंवा ते रद्द ठरवील अशाबाबतीत, अपील न्यायालय त्याबाबत लायसन देणाऱ्या किंवा त्याचे शेवटी नवीकरण करणाऱ्या लायसन देणाऱ्या प्राधिकरणाला कळवील आणि असे प्राधिकरण ते पृष्ठांकन सुधारील किंवा तशी सुधारणा करण्याची व्यवस्था करील.