मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २२ :
अपराधसिद्धीनंतर चालकाचे लायसन निलंबित करणे किंवा रद्द करणे :
१) कलम २० च्या पोट-कलम (३्न) च्या तरतुदींना बाध न आणता, कलम २१ च्या पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीला कलम १८४ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या अशा, कोणत्याही वर्गाचे किंवा वर्णनाचे वाहन धोकादायक रीतीने चालविण्यामुळे एका किंवा अधिक व्यक्तींच्या मृत्यूस किंवा त्यांना गंभीर इजा करण्यास कारण झाल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; अशा बाबतीत, ज्या न्यायालयाने अशा व्यक्तीला दोषी ठरविले असेल, असे न्यायालय त्याला योग्य वाटेल अशा कालावधीसाठी, त्या व्यक्तीने धारण केलेले लायसन त्या वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार वाहनाशी जितपत संबंधित असेल, तितपत रद्द किंवा निलंबित करू शकेल.
२) कलम २० चे पोट-कलम (२) च्या तरतुदींस बाध न आणता, कलम १८५ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच कलमाखाली शिक्षायोग्य असलेल्या अपराधासाठी पुन्हा दोषी ठरविण्यात आले असेल तर त्याला नंतरच्या वेळी दोषी ठरविणारे न्यायालय आदेशाद्वारे, अशा व्यक्तीने धारण कलेले लायसन रद्द करील.
३) एखादे चालकाचे लायसन या कलमाखाली रद्द किंवा निलंबित करण्यात आले असेल, अशा बाबतीत न्यायालय ते चालकाचे लायसन आपल्या ताब्यात घेईल, ते रद्द किंवा यथास्थिति, निलंबित करण्यात आले असेल, त्यासंबंधीचे पृष्ठांकन त्यावर करील आणि अशा प्रकारे पृष्ठांकित केलेले लायसन ते ज्या प्राधिकरणाने दिले होते किंवा ज्याने त्याचे शेवटी नवीकरण केले असेल त्या प्राधिकरणाकडे पाठवील, असे लायसन मिळाल्यावर असे प्राधिकरण ते आपल्या सुरक्षित ताब्यात ठेवील आणि ते निलंबित करण्यात आले असेल अशा बाबतीत, निलंबनाचा कालावधी समाप्त झाल्यांनतर त्या लायसनच्या धारकाने ते लायसन परत मिळण्यासाठी अर्ज केल्यांनतर ते लायसन त्याला परत करील.
परंतु, निलंबनाच्या कालावधी समाप्त झाल्यानंतर समाप्त झाल्यांनतर लायसन धारकाने, त्याला चालकाचे लायसन दिले असेल, अशा किंवा त्याचे शेवटी नवीकरण केले असेल, अशा प्राधिकरणाचे समाधान होईल अशा रीतीने कलम ९, पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली चालकाच्या क्षमतेबाबतची नवीन चाचणी दिल्याखेरीज, आणि तीमध्ये उत्तीर्ण झाल्याखेरीज आणि कलम ८, पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये आणि त्या पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याखेरीज असे कोणतेही लायसन परत करण्यात येता कामा नये.
४) कोणत्याही विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याबाबतचे लायसन या कलमाखाली रद्द किंवा निलंबित करण्यात आले असेल अशाबाबतीत चालकाचे लायसन रद्द करणे किंवा त्याचे निलंबन अमलात असेपर्यंत असे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीला त्या विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे कोणतेही लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास मनाई करण्यात येईल.