Mv act 1988 कलम २०७ : नोंदणी प्रमाणपत्र, परवाना, इत्यादी याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०७ :
नोंदणी प्रमाणपत्र, परवाना, इत्यादी याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार :
१) राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अन्य व्यक्तीला, एखादे मोटार वाहन कलम ३ किंवा कलम ४ किंवा कलम ३९ च्या तरतुदींचे उल्लंघन करून किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) खाली आवश्यक असलेल्या परवान्याविना किंवा ज्या मार्गावर किंवा ज्या क्षेत्रात किंवा ज्या प्रयोजनांसाठक्ष ते वाहन वापरता येईल त्यासंबंधीच्या परवान्यात असलेल्या कोणत्याही शर्तींचे उल्लंघन करून वापरण्यात येत आहे असे मानण्यास कारण असेल तर त्या अधिकाऱ्याला किंवा त्या अन्य व्यक्तीला ते वाहन विहित रीतीने सक्तीने ताब्यात घेता येर्इेल आणि अडवून ठेवता येईल व या प्रयोजनासाठी, वाहन तात्पुरते सुरक्षितपणे सांभाळून ठेवण्यासाठी त्याला योग्य वाटेल अशी कोणतीही उपाययोजना करता किंवा करविता येईल :
परंतु, कलम ३ किंवा कलम ४ चे उल्लंघन करून किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असलेल्या परवान्याविना मोटार वाहन वापरण्यात आलेले आहे किंवा वापरण्यात येत आहे असे मानण्यास अशा कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा व्यक्तीला कारण असेल तर त्याला ते वाहन सक्तीने ताब्यात घेण्याऐवजी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सक्तीने ताब्यात घेता येईल आणि त्यासंबंधी पोचपावती द्यावी लागेल.
२) कोणतेही मोटर वाहन पोट-कलम (१) खालाी सक्तीने ताब्यात घेण्यात आले असेल आणि अडवून ठेवण्यात आले असेल तेव्हा मोटार वाहनाचा मालक किंवा ते वाहन ज्याच्या ताब्यात असले ती व्यक्ती वाहन सोडवून घेण्यसाठी संबंद्ध दस्तऐवजांसह परिवहन प्राधिकाऱ्याकडे किवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याकहे अर्ज करू शकेल आणि असा प्राधिकारी किंवा अधिकारी अशा दस्तऐवजांची पडताळणी केल्यांनतर, त्याला लादणे आवश्यक वाटेल अशा शर्तींच्या अधीन राहून ते वाहन सोडवून देऊ शकेल.

Leave a Reply