मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८३ :
वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, इत्यादी :
१) जो कोणी कलम ११२ मध्ये निर्देशिलेल्या वेगमर्यादांचे उल्लंघन करुन मोटार वाहन चालवील १.(किंवा एखाद्या व्यक्ति द्वारे, जो त्याच्या द्वारे काम करणाऱ्या व्यक्तिला किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही व्यक्ती कडुन असे वाहन चालवील) २.(तो निम्नलिखित प्रकारे, अर्थात :-
एक) जिथे असे मोटार वाहन हलके मोटार वाहन असेल तर, एक हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु दोन हजार रुपयांपर्यंत असु शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र होईल.
दोन) जिथे असे मोटार वाहन मध्यम मालवाहू मोटार किंवा मध्यम प्रवासी मोटार वाहन किंवा अवजड माल वाहन किंवा अवजड प्रवासी मोटार वाहन असेल तर, दोन हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु चार हजार रुपयांपर्यंत असु शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र होईल.
तीन) या पोटकलमाच्या अधीन दुसऱ्या किंवा त्यानतरच्या अपराधासाठी असा वाहन चालक वाहन चालविण्याचा परवाना कलम २०६ च्या पोटलकम (४) मधील तरतुदींअन्वये जप्त होण्यास पात्र होईल.)
३.(***)
३) आपल्या मते एखादी व्यक्ती बेकायदेशीर वेगाने वाहन चालवीत होती अशा आशयाची साक्ष एका साक्षीदाराने दिली असता, काही यांत्रिक ४.(किंवा इलेक्ट्रॉनिक) साधनांचा वापर करुन काढलेल्या अंदाजावर ते मत आधारलेले होते असे दाखवून दिल्याशिवाय, केवळ तेवढ्याच पुराव्यावरुन अशा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम (१) अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविले जाणार नाही.
४) एखादा प्रवास किंवा प्रवासाचा काही भाग एका ठराविक मुदतीत संपवायचा आहे असे दाखविणारे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले असून किंवा तो त्याप्रमाणे संपवावा अशी सूचना दिलेली असून, जर न्यायालयाच्या मते त्या प्रकरणाच्या परिस्थितीमुळे तो प्रवास किंवा प्रवासाचा भाग कलम ११२ मध्ये उल्लेख केलेल्या वगमर्यादांचा भंग केल्याशिवाय त्या ठरावीक मुदतीत संपविणे शक्य नसल्यास अशी प्रसिद्धी किंवा सूचना म्हणजेच ज्या व्यक्तीने ते वेळापत्रक प्रसिद्ध केलेले असेल किंवा ती सूचना दिलेली असेल, त्या व्यक्तीने ५.(पोटकलम (१)) खाली शिक्षापात्र असलेला अपराध केला असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा असेल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६६ अन्वये पोटकलम (२) वगळण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६६ अन्वये पोटकलम २ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.