Mv act 1988 कलम १५ : चालकाच्या लायसनचे नुतनीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५ :
चालकाच्या लायसनचे नुतनीकरण :
१) कोणत्याही लायसन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आल्यावर त्याला, या अधिनियमाच्या उपबंधाखाली देण्यात आलेल्या लायसनचे, त्याच्या समाप्तीच्या दिनांकापासून नूतनीकरण करता येईल :
परंतु, जेथे लायसनाच्या नूतनीकरणाचा अर्ज त्याच्या १.(समाप्ती दिनांका पूर्वी एक वर्ष किंवा एक वर्षात) करण्यात आला असेल तर अशा कोणत्याही बाबतीत चालकाच्या लायसनचे नूतनीकरण त्याच्या नूतनीकरणाच्या दिनांकापासून करण्यात येईल :
परंतु, आणखी असे की, परिवहन वाहन चालविण्याच्या लायसनचे नूतनीकरण करण्याकरता अर्ज केलेला असेल त्याबाबतीत किंवा जेथे अर्जदाराने वयाची चाळीस वर्षे पूर्ण केलेली असतील, अशा कोणत्याही अन्य बाबतीत त्या अर्जासोबत कलम ८ च्या पोटकलम (३) मध्ये निर्देश केल्याप्रमाणे त्याच रीतीने आणि त्याच नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल आणि कलम ८ च्या पोटकलम (४) चे उपबंध हे, शिकाऊ व्यक्ती लायसनाच्या संबंधात ज्याप्रमाणे लागू होतात त्याप्रमाणेच अशा प्रत्येक बाबतीत, शक्य होईल तितपत लागू होतील.
२) चालकाच्या लायसनच्या नुतनीकरणासाठी केलेला अर्ज हा, केंन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व विहित करण्यात येतील असे दस्तऐवज सोबत जोडून करण्यात येईल.
३) जेथे चालकाच्या लायसनच्या नुतनीकरणासाठी त्याच्या समाप्ती दिनांकापूर्वी किंवा समाप्ती दिनांकानंतर, २.(एक वर्षाहून) अधिक नसेल अशा कालावधीत अर्ज करण्यात आला असेल तेथे, अशा नूतनीकरणासाठी द्यावयाची फी, याबाबत केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल तेवढ्या रकमेइतकी असेल.
४) जेथे चालकाच्या लायसनच्या नूतनीकरणासाठी त्याच्या समाप्ती दिनांकानंतर ३.(एक वर्षाहून) अधिक काळाने अर्ज करण्यात आला असेल तेथे, अशा नूतनीकरणासाठी द्यावयाची फी केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल तेवढी असेल :
परंतु, पोटकलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत, अर्जदाराला उचित व पुरेशा कारणामुळे अर्ज करण्यास प्रतिबंध झाला होता अशी जर लायसन प्राधिकरणाची खात्री झाली तर, या पोटकलमाखाली करण्यात आलेल्या चालकाच्या लायसनच्या नूतनीकरणाच्या अर्जाच्या संबंधात लायसन प्राधिकरणाला, पोटकलम (३) मध्ये उल्लेखिलेली फी स्वीकारता येईल :
परंतु आणखी असे की, ४.(चालकाच्या लायसनची परिणामकता संपल्यानंतर एक वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर) अर्ज करण्यात आला असेल तेथे, कलम ९ च्या पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेली चालन क्षमतेची चाचणी देऊन लायसन प्राधिकरणाचे समाधान होईल अशा रीतीने अर्जदार ती मध्ये उत्र्तीण न झाल्यास, लायसन प्राधिकरण, चालकाच्या लायसनचे नूतनीकरण करण्यास नकार देऊ शकेल.
५) जेथे नूतनीकरणाचा अर्ज नाकारण्यात आला असेल तेथे देण्यात आलेली फी, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा मर्यादेपर्यन्त व अशा रीतीने परत करण्यात येईल.
६) जेव्हा चालकाच्या लायसनचे नूतनीकरण करणारे प्राधिकरण हे ज्याने असे चालन लायसन दिले ते प्राधिकरण नसेल तेव्हा, ते प्राधिकरण नूतनीकरणाबाबतची वस्तूस्थिती, चालन लायसन देणाऱ्या प्राधिकरणास कळवील.
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १० अन्वये तीस दिवसांनतर या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १० अन्वये तीस दिवसांहून या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १० अन्वये तीस दिवसांहून या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १० अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply