Mv act 1988 कलम १५२ : १.(विम्यासंबंधी माहिती देण्याचे कर्तव्य :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५२ :
१.(विम्यासंबंधी माहिती देण्याचे कर्तव्य :
१) कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही दायित्वाबाबत ज्या व्यक्तीविरुद्ध हक्कमागणी दाखल केलेली आहे अशी कोणतीही व्यक्ती, हक्कमागणी करणाऱ्या व्यक्तीकडून किंवा तिच्या वतीने तशी मागणी करण्यात आली असता, या प्रकरणाच्या उपबंधाखाली काढलेल्या कोणत्याही विमापत्राद्वारे त्या दायित्वासंबंधात तिला विमारक्षण मिळालेले आहे की नाही, अथवा विमाकाराने जर विमापत्र शून्य केले नसते किंवा रद्द केले नसते तर तशा प्रकारे विमारक्षण मिळाले असते की नाही हे निवेदन करण्याचे नाकारु शकणार नाही, तसेचच जर ती याप्रमाणे विमारक्षित केलेली असेल किंवा होऊ शकली असती असे असेल तर, त्या विमापत्रासंबंधी दिलेल्या विमा प्रमाणपत्रात त्यासंबंधी विनिर्दिष्ट केलेला असा तपशील देण्याचेही ती नाकारु शकणार नाही.
२) एखादी व्यक्ती दिवाळखोर झाल्यास अगर तिने आपल्या धनकोशी तडजोड किवा व्यवस्था केल्यास अथवा दिवाळखोरीच्या कायद्यानुसार मृत व्यक्तींच्या संपदेच्या प्रशासनासाठी आदेश देण्यात आल्यास, अथवा कोणत्याही कंपनीसंबंधात तिच्या परिसमापनाचा आदेश देण्यात आल्यास अगर स्वेच्छापूर्वक परिसमापन करण्याचा ठराव संमत करण्यात आल्यास नगर कंपनीच्या व्यवसायासाठी किंवा उपक्रमासाठी प्रापक (रिसिव्हर) किंवा व्यवस्थापक रीतसर नियुक्त करण्यात आल्यास, अथवा त्या प्रभाराद्वारे प्रतिभूत केलेल्या कोणत्याही ऋृणपत्रांच्या धारकांनी किंवा त्यांचच्या वतीने प्रभारात समाविष्ट किवा त्यास अधीन असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा कब्जा घेतल्यास, दिवाळखोर ऋृणको, मृत ऋृृणको किंवा कंपनी यांच्यावर या प्रकरणाच्या कक्षेत येणारे असे दायित्व आपणाप्रत आहे असा दावा सांगणाऱ्या व्यक्तीने विनंती केली असता, कलम १५१ खाली काही अधिकार आपणाकडे हस्तांतरित होऊन निहित झाले आहे किंवा काय याची खातरजमा करण्यासाठी आणि असे काही अधिकार असल्यास ते बजावण्यासाठी ती वाजवीरीत्या अपेक्षील अशी माहिती देणे हे, दिवाळखोर ऋृणको, मृत ऋृणकोचा वैयक्तिक प्रतिनिधी किंवा, प्रकरणपरत्वे, कंपनी यांचे अथवा दिवाळखोरी कार्यवाहीतील पदस्थ अभिहस्तांकिती किंवा प्रापक (रिसिव्हर), विश्वस्त, समापक किवा व्यवस्थापक किंवा मालमत्तेचा कब्जा असणारी व्यक्ती यांचे कर्तव्य असेल, आणि अशा ज्या विमा संविदेला पूर्वोक्त प्रसंगी अशी माहिती देण्यात आल्याच्या कारणास्तव प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ती संविदा शून्य करण्याचे किंवा पक्षांना त्याखाली असलेल्या अधिकारास फेरबदल करण्याचे, अथवा उक्त प्रसंगी अशी माहिती देण्यास अन्यथा मनाई किंवा प्रतिबंध, करण्याचे अभिप्रेत असेल अशी कोणतीही विमा संविदा परिणामकारक असणार नाही.
३) पोटकलम (२) अनुसार किंवा अन्यथा कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेल्या माहितीवरुन जर एखाद्या विमाकाराविरुद्ध असलेले कोणतेही अधिकार या प्रकरणाखाली आपणाकडे हस्तांतरित झाले आहेत किंवा झाले असण्याची शक्यता आहे असे समजण्यास त्या व्यक्तीला वाजवी कारण मिळाले तर, उक्त पोटकलमाद्वारे त्यांत उल्लेखिलेल्या व्यक्तींना जे नेमून देण्यात आले आहे त्याच कर्तव्याला तो विमाकार अधीन असेल.
४) माहिती देण्याबाबत या कलमाद्वारे नेमून देण्यात आलेल्या कर्तव्यात, जिला असे कर्तव्य नेमून देण्यात आले आहे अशा व्यक्तीच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विमासंविदा, विम्याच्या हप्त्याच्या पावत्या, आणि अन्य संबंध दस्तऐवज निरीक्षणास त्यांच्या नकला करुन घेण्यास मुभा देण्याचे कर्तव्य अंतर्भूत आहे.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply