मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५० :
१.(त्रयस्थ पक्षीय जोखमीच्या संबंधात विमेदार व्यक्तीच्या विरुद्ध देण्यात आलेले न्यायनिर्णय आणि निवाडे यांची पूर्तता करण्याचे विमाकारांचे कर्तव्य :
१) विमापत्र ज्या व्यक्तीने काढले अशा व्यक्तीच्या नावे कलम १४७ च्या पोटकलम (३) खाली विमापत्र देण्यात आल्यानंतर जर विमापत्राद्वारे विमा उतरवलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध, कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) खाली विमापत्राच्या व्याप्तीत येणे आवश्यक असेल अशा कोणत्याही दायिद्वाबाबत (विमापत्रांच्या अटींच्या व्याप्तीत आलेले दायित्व असल्यामुळे) किंवा कलम १६४ च्या उपबंधाच्या अधीनतेने न्यायनिर्णय अथवा निवाडा मिळविण्यात आला असेल तर, विमाकार ते विमापत्र टाळण्यास किंवा रद्द करण्यास हक्कददार असला किंवा त्याने ते टाळले किंवा रद्द केलेले असले तरीही, या कलमाच्या उपबंधाच्या अधीनतेने तो विमाकार जणू काही न्यायनिर्णीत ऋृणको असावा त्याप्रमाणे हुकूमनाम्याच्या लाभास हक्कदार असलेल्या व्यक्तीला त्याखाली प्रदेय असलेल्या रकमेपेक्षा अधिक नसेल अशी कोणतीही रक्कम व त्यासोबत दाव्याच्या खर्चापोटी प्रदेय असलेली कोणतीही रक्कम व निर्णीत रकमेवरील व्याजासंबंधीच्या कोणत्याही अधिनियमितींच्या आधारे त्या रकमेवरील व्याज म्हणून प्रदेय असलेली कोणतीही रक्कम देईल.
२) ज्या कार्यवाहीत तो न्यायनिर्णय अथवा निवाडा देण्यात आला असेल ती कार्यवाही दाखल करण्यात आल्याविषयी कार्यवाहीच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर विमाकाराला न्यायालयामार्फत नोटीस मिळालेली नेसल तर, अशा कोणत्याही न्यायनिर्णयासंबंधी अथवा निवाड्यासंबंधी अथवा त्यावर अपील व्हावयाचे असून त्याची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली असेल तोवर अशा कोणत्याही न्यायनिर्णयासंबंधी अथवा न्यायनिवाड्यासंबंधी पोटकलम (१) खाली विमाकाराला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही, आणि प्रकरणपरत्वे, ज्या विमाकाराला अशी कार्यवाही दाखल करण्यात आल्याविषयी नोटीस देण्यात आली असेल त्याला त्या कार्यवाहीत आपणास पक्षकार करवून घेण्याचा व पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन त्या कारवाईत बचाव देण्याचा हक्क राहील, ती कारणे अशी :-
(a)क) अ) पुढील शर्तींपैकी विमापत्रात विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या शर्तीचा भंग झालेला आहे; त्या शर्ती अशा :-
एक) वाहनाचा वापर करण्याच्या अटी व्यतिरिक्त –
(A)अ) वाहन हे विमासंविदेच्या दिनांकास भाडे किंवा मोबदला यांच्या बदल्यात चालवण्यासाठी दिलेल्या परवान्याच्या व्याप्तीत न येणारे वाहन असेल तर, भाडे किंवा मोबदला याच्या बदल्यात; किंवा
(B)ब) आयोजित शर्यतीकरता व वेग चाचणीकरिता; किंवा
(C)क) जर वाहन हे एखादे परिवाहन असेल तर ज्या परवान्याअन्वये वाहन वापरण्यात येते त्या परवान्याद्वारे मान्यता न मिळालेल्या प्रयोजनासाठी; किंवा
(D)ड) वाहन हे मोटार सायकल असेल तर जोड यान संलग्न न करता; किंवा
दोन) नामनिर्दिष्ट व्यक्तीला अथवा व्यक्तींना अथवा जिला रीतसर लायसन देण्यात आलेले नाही अशा कोणत्याही व्यक्तीला अथवा अनर्ह ठरविण्यात आलेल्या ज्या व्यक्तीला अनर्हतेच्या कालावधीत चालन लायसन धारण करण्यात किंवा मिळविण्यास बंदी आहे किंवा कलम १८५ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे मद्य किंवा मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणे अशा कोणत्याही व्यक्तीला वाहन चालवण्यास मना करणारी शर्त; किंवा
तीन) युद्ध, यादवी युद्ध, दंगा किंवा नागरी विक्षोभ या परिस्थितीमुळे घडून आलेल्या किंवा अंशत: त्यामुळे घडलेल्या इजेबद्दलचे दायित्व वर्जिणारी शर्त; किंवा
(b)ख)ब) महत्वाचे तथ्य, उघड न करता किंवा त्यातील काही महत्वाचा तपशील खोटा होता असे अभिवेदन करुन विमापत्र मिळवण्यात आले होते या आधारावर ते शून्य आहे; किंवा
(c)ग) क) विमा अधिनियम १९३८ याच्या कलम (६४ व्हीबी) अन्वये आवश्यक असलेला हप्ता न मिळाल्याबद्दल.
३) जेव्हा पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्याप्रमाणे असा कोणताही न्यायनिर्णय किंवा निवाडा एखाद्या देवाणघेवाण करणाऱ्या देशातील न्यायालयाकडून मिळविण्यात आलेला असेल आणि विदेशी न्यायनिर्णयाच्या बाबतीत दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ यामधील कलम १३ च्या उपबंधांच्या आधारे तो, त्याद्वारे अभिनिर्णित केलेल्या बाबीपुरता निर्णायक असेल, तेव्हा, विमाकार (विमा अधिनियम १९३८ या खाली नोंदलेला असा विमाकार मग तो देवाण घेवाण करणाऱ्या देशातील समनुरुप अधिनियमाखाली नोंदलेला असो वा नसो) हुकूमनाम्याच्या लाभास हक्कदार असेल्या व्यक्तीप्रत, जणू काही तो न्यायनिर्णय किंवा निवाडा भारतातील न्यायालयाने दिला असावा त्याप्रमाणे पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने व तेवढ्याच व्याप्तीपर्यंत दायी राहील :
परंतु, ज्या कार्यवाहीत तो न्यायनिर्णय किंवा निवाडा देण्यात आला असेल ती कार्यवाही दाखल करण्यात आल्याविषयी कार्यवाहीच्या प्रारंभापूर्वी किंंवा त्यानंतर विमाकाराला न्यायालयामार्फत सूचना मिळाली नसेल तर अशा कोणत्याही न्यायनिणर्य किंवा निवाड्यासंबंधी विमाकाराला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही आणि ज्या विमाकाराला याप्रमाणे सूचना देण्यात आली असेल त्याला देवाणघेवाण करणाऱ्या देशातील समनुरुप अधिनियमाखाली, त्या कार्यवाहीत आपणास पक्षकार करवून घेण्याचा व पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तशाच कारणावरुन त्या कारवाईत बचाव देण्याचा हक्क राहील.
४) जिने विमापत्र काढले त्या व्यक्तीस कलम १४७ च्या पोटकलम (३) खाली विमाप्रमाणपत्र देण्यात आले असेल त्या बाबतीत, विमापत्राच्या जेवढ्या भागापुढे त्याद्वारे विमा उतरवलेल्या व्यक्तींचा विमा पोटकलम (२) मधील शर्तीहून अन्य कोणत्याही शर्तींना अनुलक्षून मर्यादित होत असल्याचे दिसत असेल तेवढा भाग कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) खाली विमापत्राच्या व्याप्तीत येणे आवश्यक असलेल्या दायित्वाबाबत परिणामक असणार नाही.
५) ज्यास पोटकलम (२) किंवा पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेली नोटीस देण्यात आली आहे असा कोणताही विमाकार पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही न्यायनिर्णयाच्या अथवा निवाड्याच्या अथवा पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेल्या अशा न्यायनिर्णयाच्या लाभास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीगत असलेले आपले दायित्व पोटकलम (२) मध्ये अथवा, प्रकरणपरत्वे, देवाणघेवाण करणाऱ्या देशाच्या समनुरुप अधिनियमामध्ये उपबंधित केलेले असेल त्याहून अन्य रीतीने टाकण्यास हक्कदार असणार नाही.
६) जर कोणताही दावा दाखल करण्याच्या तारखेला, ज्या विमा कंपनीकडे वाहनाचा विमा उतरवला गेला होता याबद्दल दावेदाराला माहीत नसेल, तर अशा बाबतीत वाहनाच्या मालकाचे कर्तव्य आहे की ते न्यायाधिकरणाला किंवा न्यायालयाला वाहनाचा विमा ज्या तारखेला अपघात झाला असेल त्यावेळेस उतरविलेला होता, आणि जर असे असेल तर ज्या विमा कंपनीकडे उतरविलेला होता त्याचे नाव व इतर याविषयी माहीती देणे आवश्यक आहे.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी –
(a)क)अ) निवाडा याचा अर्थ कलम १६८ खाली न्यायाधीकिरणाने केलेला निवाडा असा आहे;
(b)ख)ब) दावा न्यायाधिकरण (मागणी हक्क अधिकरण) याचा अर्थ कलम १६५ खाली प्रस्थापित केलेले न्यायाधिकरण असा आहे;
(c)ग) क) विमापत्रांच्या अटींच्या व्याप्तीत येणारे दायित्व या शब्दप्रयोगाचा अर्थ जे दायित्व विमापत्राच्या व्याप्तीत येते अथवा विमाकार विमापत्र शून्य करण्यास किंवा रद्द करण्यास हक्कदार आहे किंवा त्याने ते शून्य किंवा रद्द केलेले आहे अशी गोष्ट घडली नसती तर जे याप्रमाणे त्यांच्या व्याप्तीत आले असते ते दायित्व, असा आहे; आणि
(d)घ) ड) महत्वाचे तथ्य व महत्वाचा तपशील या शब्द प्रयोगांचा अर्थ, आपण जोखीम पत्करावी किंवा काय आणि पत्करावयाची झाल्यास किती अधिमूल्याने व कोणत्या शर्तीवर पत्करावी हे निश्चित करताना व्यवहारी विमाकराच्या निर्णयशक्तीवर प्रभाव पाडू शकेल अशा स्वरुपाचे अनुक्रमे तथ्य किवा तपशील असा आहे.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.