मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४६ :
१.(त्रयस्थपक्षीय जोखमीकरिता विम्याची आवश्यकता :
१) कोणतीही व्यक्ती प्रवासी म्हणून वाहनाचा उपयोग करण्याची बाब खेरीज करुन एरव्ही, या प्रकरणाच्या आवश्यकता पूर्ण करणारे विमापत्र अंमलात असल्याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी वाहनाचा वापर करता कामा नये किंवा इतर व्यक्तीला यथास्थिती अन्य कोणत्याही व्यक्तीला असा वापर करण्यास लावता कामा नये :
परंतु धोकादायक किंवा जोखमीचा माल वाहून नेणाऱ्या किंवा वाहून नेण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वाहनाच्या बाबतीत सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम १९९१ खालील विमापत्रसुद्धा असणे आवश्यक असेल.
स्पष्टीकरण :
मोटार वाहनाच्या उपयोगासंबंधात या पोटकलमान्वये आवश्यक असलेले असे कोणतेही विमापत्र अंमलात नसताना, केवळ पगारी नोकर म्हणून वाहन चालविणाऱ्या व्यक्तीला असे कोणतेही विमापत्र अंमलात नसल्याचे माहीत नसेल किंवा तसे समजण्यास तिला कारण नसेल तर, ती या पोटकलमाचे व्यतिक्रमण करुन वागत आहे असे मानले जाणार नाही.
२) केन्द्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या मालकीच्या व कोणत्याही वाणिज्यिक उद्यमाशी संबंधित नसलेल्या शासकीय प्रयोजनांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनास पोटकलम (१) चे उपबंध लागू होणार नाही.
३) पुढीलपैकी कोणत्याही प्राधिकरणाच्या मालकीच्या कोणत्याही वाहनास समुचित शासन आदेशाद्वारे पोटकलम (१) च्या प्रवर्तनापासून सूट देऊ शकेल, ती प्राधिकरणे अशी –
(a)क)अ) केन्द्र शासन किंवा राज्य शासन, जर ते वाहन कोणत्याही वाणिज्यिक उद्दमाशी संबंधित असलेल्या शासकीय प्रयोजनासाठी उपयोगात आणले जात असेल तर;
(b)ख)ब) कोणतेही स्थानिक प्राधिकरण;
(c)ग) क) कोणताही राज्य परिवहन उपक्रम :
परंतु, समुचित शासन विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, त्यासंबंधात करण्यात आलेल्या नियमानुसार निधी स्थापन करुन तो राखलेला असल्याखेरीज, अशा कोणत्याही प्राधिकरणाच्या संबंधात असा कोणताही आदेश केला जाणार नाही.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, समुचित शासन याचा अर्थ केन्द्र शासन किंवा प्रकरणपरत्वे, राज्य शासन असा आहे आणि –
एक) केन्द्र शासनाच्या किंवा कोणत्याही राज्य शासनांच्या मालकीच्या कोणत्याही निगमाच्या किंवा कंपनीच्या संबंधात त्याचा अर्थ, केन्द्र शासन किंवा ते राज्य शासन असा आहे;
दोन) केन्द्र शासनाच्या आणि एका किंवा अधिक राज्य शासनाच्या मालकीच्या कोणत्याही महामंडळाच्या निगमाच्या किंवा कंपनीच्या संबंधात त्याचा अर्थ, केन्द्र शासन असा आहे;
तीन) अन्य कोणत्याही राज्य परिवहन उपक्रमाच्या किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या संबंधात, त्याचा अर्थ ज्याचे त्या उपक्रमावर किंवा प्राधिकरणावर नियंत्रण असेल ते शासन, असा आहे.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.