Mv act 1988 कलम १३० : लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे कर्तव्ये :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३० :
लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे कर्तव्ये :
१) सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोटार वाहनाच्या चालकाकडे, कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता त्याने तपासणीसाठी आपले लायसन सादर केले पाहिजे :
परंतु, अशा चालकाचे लायसन या किंवा इतर कोणत्याही अधिनियमाद्वारे अधिकाऱ्याकडे किंवा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले असेल किंवा त्यांच्याकडून जप्त करण्यात आले असेल, अशा बाबतीत अशा लायसनच्या बाबतीत अशा अधिकाऱ्याने किंवा प्राधिकरणाने दिलेली पावती किंवा अन्य पोचपत्र अशा चालकाने सादर केले पाहिजे आणि त्यानंतर असे लायसन केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल, अशा कालावधीत आणि अशा रीतीने मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला सादर करण्यात आले पाहिजे.
१.(२) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या एखाद्या मोटार वाहनाच्या वाहकाने, मोटार वाहन विभागाच्या त्या बाबतीत अधिकार प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागणी केली असता तपासणीसाठी लायसन सादर केले पाहिजे.)
२.(३) मोटार वाहनाचा मालक (कलम ६० नुसार वाहनाची नोंदणी करण्यात आली असेल, अशा वाहनाखेरीज अन्य वाहनाचा ) किंवा त्याच्या अनुपस्थितीमध्ये चालक किंवा वाहनाचा ताबा असलेल्या अन्य व्यक्तीने नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणाने किंवा मोटार वाहन विभागातील या बाबतीत अधिकार प्रदान करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने मागणी केली असता वाहनाच्या विम्याचे प्रमाणपत्र सादर केले पाहिजे आणि ते वाहन परिवहन वाहन असेल, अशा बाबतीत कलम ५६ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षमता प्रमाणपत्र आणि परवानाही सादर केला पाहिजे; आणि कोणतेही किंवा सर्व प्रमाणपत्रे किंवा परवाना त्याच्या ताब्यात नसेल, अशा बाबतीत मागणी करण्यात आल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसामध्ये त्या कागदपत्रांच्या योग्य रीतीने साक्षांकित केलेल्या फोटो प्रती अशी मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे एकतर स्वत: सादर केले पाहिजे किंवा नोंदणीकृत डाकेने पाठवून दिले पाहिजे.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनासाठी, विमा प्रमाणपत्र याचा अर्थ कलम १३७ च्या पोट-कलम (३) नुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र असा आहे.)
४) पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली प्रमाणपत्रे किंवा पोट-कलम (३) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली प्रमाणपत्रे किंवा परवाना यांची ज्या व्यक्तीकडून मागणी करण्यात आली असेल अशा व्यक्तीच्या ताब्यात त्या वेळी नसती, अशा बाबतीत अशा व्यक्तीने, केंद्र शासन विहीत करील अशा कालावधीत आणि अशा रीतीने ते लायसन किंवा प्रमाणपत्रे किंवा परवाने त्यांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे सादर केल्यास ते या कलमाचे योग्य पालन ठरेल :
परंतु, विहित करण्यात आल्या असतील, अशा मर्यादांपर्यंत आणि अशा फेरफारांसह असेल तेखेरीज करून, या पोट-कलमातील कोणत्याही तरतुदी, परिवहन वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा क्षमता प्रमाणपत्र सादर करण्यास फर्मावण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे कलम लागू असणार नाहीत.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply