Mv act 1988 कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११६ :
वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :
१) (a)क) अ) राज्य शासन किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेले कोणतेही प्राधिकरण, कलम ११२ च्या पोटकलम (२) खाली निश्चित केलेल्या कोणत्याही वेगमर्यादा अथवा कलम ११५ खाली कोणत्याही गोष्टींना मनाई किंवा निर्बध लोकांच्या नजरेला आणून देण्यासाठी किंवा सर्वसाधारणपणे, मोटार वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक संकेत चिन्हे लावण्याची किंवा उभारण्याची व्यवस्था करु शकेल किंवा तशी परवानगी देऊ शकेल.
(b)ख) ब) राज्य शासन किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेले कोणतेही प्राधिकरण, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे किंवा अनुसूचीच्या विभाग (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या समुचित वाहतूक संकेत चिन्हांची सोईस्कर ठिकाणी उभारणी करुन केन्द्र शासनाने केलेल्या चालन विनियमांच्या प्रयोजनांकरिता, विवक्षित रस्ते हे मुख्य रस्ते म्हणून संबोधित करु शकेल.
(1A)१.(१अ(क)) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असलेल तरीही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिनियम १९८८ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण किंवा केन्द्र शासनाने प्राधिकृŸत केलेल अन्य अभिकरण यांना पहीली अनुसूचीत उपबंधित केल्याप्रमाणे राष्ट्रीय राजमार्गावर वाहतूकीची संकेत चिन्हे उभारण्याची किंवा स्थापन्याची किंवा हटविण्याची परवानगी देता येईल व मोटार वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात हटविण्यास आदेश देऊ शकेल, जी त्यांच्या मताप्रमाणे अशी उभी केली आहे की ज्यामुळे वाहतूक चिन्ह दिसण्यास अडथळा निर्माण होतो किंवा ते वाहतूक संकेत चिन्हा समान दिसत असल्यामुळे चालक भ्रमीत होण्याची किंवा त्याची सावधानी भंग पावण्याची संभावना आहे :
परंतु या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण किंवा केन्द्र शासन द्वारा प्राधिकृत इतर अन्य अभिकरण राज्य शासनाच्या प्राधिकरणांकडून सहायता मागू शकेल आणि उक्त राज्य शासन अशी सहायता पुरवेल.)
२) ज्याकरता अनुसूचीत उपबंध केलेला आहे अशा कोणत्याही प्रयोजनार्थ, पोटकलम (१) खाली स्थापित केलेल्या किंवा उभारलेल्या वाहतूक संकेत चिन्हांचे आकारमान, रंग आणि प्रकार अनुसूचीत दिल्याप्रमाणे असतील व त्यांना त्याप्रमाणेच अर्थ असेल, पण राज्य शासन किंवा राज्य शासनाने याबाबतीत अधिकार प्रदान केलेले कोणतेही प्राधिकरण उक्त अनुसूचीत दिलेल्या कोणत्याही चिन्हाच्या जोडीला त्यावरील शब्द, अक्षरे किंवा आकडे राज्य शासनाला योग्य वाटेल अशा लिपीत प्रतिलिखित करु शकेल किंवा तसे करणे प्राधिकृत करु शकेल परंतु अशा प्रति लिखित मजकुरांचे आकारमान व रंग, अनुसूचीत दिलेले शब्द, अक्षरे व आकडे यांच्या सारखेच असतील.
३) पोटकलम (१) २.(किंवा पोटकलम (१अ)) मध्ये जसे उपबंधित केले आहे त्याव्यतिरिक्त, कोणतेही वाहतूक संकेत चिन्ह, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर कोणत्याही मार्गावर किंवा मार्गाजवळ स्थापित करण्यात किंवा उभारण्यात येणार नाही. पण कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी उभारलेली सर्व वाहतूक संकेत चिन्हे, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, पोटकलम (१) च्या उपबंधाखाली स्थापित केलेली, उभारलेली रहदारी संकेत चिन्हे असल्याचे मानण्यात येईल.
४) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, पोलीस अधिक्षकापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, त्याच्या मते रहदारी संकेत चिन्हे नीट दिसणार नाहीत अशा प्रकारे जी स्थापित करण्यात आली आहेत अशी कोणतीही चिन्हे किंवा जाहिरात अथवा जी त्याच्या मते वाहतूक संकेच चिन्हासारखीच दिसत असून त्यामुळेच दिशाभूल होत आहे असे कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात अथवा त्याच्या मते, ज्यामुळे चालकाचे अवधान अथवा एकाग्रता विचलित होत आहे असे कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात काढून टाकण्याची किंवा काढून टाकायला लावण्याची शक्ती प्रदान करु शकेल.
५) कोणत्याही व्यक्तीला, या कलमाखाली स्थापित केलेली किंवा उभारलेली कोणतीही वाहतूक संकेत चिन्हे, बुद्धिपुर:सर हलवता येणार नाहीत, किंंवा त्यात फेरबदल करता येणार नाही किंवा ती विरुपित करता येणार नाहीत किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यात गैरफेर करता येणार नाही.
६) एखादे वाहतूक संकेत चिन्ह या कलमाखाली ज्याकरिता स्थापित करण्यात किंवा उभारण्यात आले असेल त्या प्रयोजनाच्या दृष्टीने, ते निरुपयोगी होईल अशा प्रकारे जर कोणत्याही व्यक्तीकडून त्या चिन्हाची अभावितपणे खराबी झाली तर, कोणत्याही परिस्थितीत ती घटना घडली त्याची खबर त्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर आणि काही झाले तरी, ती घटना घडल्यापासून चोविस तासांच्या आत, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा पोलीस ठाण्यावर दिली पाहिजे.
७) ३.(पहिली अनुसूची) मध्ये घालून दिलेली संकेत चिन्हे, केन्द्र शासन त्या त्या वेळी ज्यात सहभागी असेल अशा मोटार वाहतूक विषयक अंतरराष्ट्रीय अभिसंधिनुरुप करण्याच्या प्रयोजनार्थ, केन्द्र शासनाला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा कोणत्याही चिन्हामध्ये भर घालता येईल किंवा फेरबदल करता येईल आणि अशी कोणतीही अधिसूचना काढल्यावर ३.(पहिली अनुसूची) त्यानुसार विशोधित झाली आहे असे मानन्यात येईल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply