मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११५ :
वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :
सार्वजनिक सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही रस्त्याच्या किंवा पुलाच्या स्वरूपामुळे तसे करणे आवश्यक आहे याबाबत राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाचे समाधान झाले असेल तर ते प्राधिकरण/शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील, असे अपवाद व शर्ती यांना अधीन राहून, मोटाार वाहन किंवा विनिर्दिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन किंवा अनुयान सर्वसाधारणपणे एखाद्या विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा विनिर्दिष्ट रस्त्यावर चालविण्यास किंवा वापरण्यास प्रतिबंध करू शकेल किंवा त्यावर निर्बंध घालू शकेल आणि अशा प्रकारचा प्रतिबंध किंवा निर्बंध लादण्यात आला असेल, अशा बाबतीत कलम ११६ नुसार योग्य अशा ठिकाणी उचित वाहतूक चिन्हे बसविण्याची किंवा उभारण्याची व्यवस्था करण्यात येईल.
परंतु, या कलमाखालील प्रतिबंध किंवा निर्बंध एका महिन्यापेक्षा अधिक नाही इतक्या कालावधीसाठी अमलात असतील, अशा बाबतीत त्याबाबतची अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असणार नाही, परंतु, परिस्थितीनुसार अनुज्ञेय असेल, अशा प्रकारची प्रसिद्ध अशा प्रतिबंधांना किंवा निर्बंधांना स्थानिक रीतीने देण्यात आली पाहिजे.