मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ८ :
वाहतूक नियंत्रण :
कलम ११२ :
वेग मर्यादा :
१) कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, वाहनासाठी या अधिनियमाद्वारे किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा अन्वये निश्चित करण्यात आली असेल, अशा कमाल वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने किंवा किमान वेगमर्यादेपेक्षा कमी वेगाने एखादी मोटार चालविता कामा नये किंवा मोटार वाहन चालविण्यास भाग पाडता किंवा अनुज्ञा देता कामा नये.
परंतु, असा कमाल वेग हा, केंद्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही मोटार वाहनासाठी किंवा मोटार वाहनाच्या कोणत्याही प्रकारासाठी किंवा वर्णनासाठी निश्चित केलेल्या कमाल वेगापेक्षा कोणत्याही बाबतीत अधिक असता कामा नये.
२) राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकार दिलेल्या कोणत्याही प्राधिकरणाला लोकांच्या सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही रस्त्याच्या किंवा पुलाच्या स्वरूपामुळे वेगावर बंधणे घालणे आवश्यक आहे असे वाटल्यास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि कलम ११६ नुसार योग्य ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवून किंवा उभारून मोटार वाहनासाठी एकतर सर्वसाधारणपणष किंवा विशिष्ट क्षेत्रासाठी किंवा विशिष्ट रस्त्यावर किंवा रस्त्यांवर त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कमाल वेगमर्यादा किंवा किमान वेगमर्यादा निश्चित करता येईल;
परंतु या कलमाखालील निर्बंध एक महिन्यापेक्षा कमी काळासाठी अमलात राहणार असेल, अशा बाबतीत अशा अधिसूचनेची आवश्यकता असणार नाही.
३) कलम ६० खाली नोंदणी करण्यात आलेले कोणतेही वाहन, डावपेच, मैदानी गोळीबार व तोफखाना सराव अधिनियम, १९३८ च्या कलम २, पोट-कलम (१) खालील अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले असेल, अशा क्षेत्रात व अशा कालावधीसाठी सैनिकी डावपेचांसाठी वापरण्यात येत असेल, अशा बाबतीत या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.