मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ७ :
मोटार वाहनांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे व त्यांची देखभाल करणे :
कलम १०९ :
वाहनाची बांधणी आणि देखभाल यासंबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी :
१) प्रत्येक मोटार वाहनाची बांधणी व देखभाल अशा प्रकारे करण्यात येईल की, ते नेहमी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीच्या प्रभावी नियंत्रणाखाली राहील.
२) प्रत्येक मोटार वाहनाची अशा प्रकारे बांधणी करण्यात येईल की, त्याला विहित स्वरूपाचे यांत्रिक किंवा विद्युत उपकरण बसविण्यात आलेले नसेल, तर त्याचा स्टिअरिंग कंट्रोल उजव्या हाताला असेल.
१.(३) लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक किंवा इष्ट आहे असे केंद्र शासनाचे मत असल्यास, ते शासकीय राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून अधिसूचित करील की, निर्माण करणाऱ्याने वापरलेली कोणतीही वस्तू किंवा प्रक्रिया त्या आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा दर्जाशी अनुरूप आहे.)
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ३१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.