Site icon Ajinkya Innovations

JJ act 2015 कलम ९५ : बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९५ :
बालकाचे त्याच्या निवासस्थानी स्थलांतरण :
१) जर चौकशीच्या दरम्यान असे आढळून आले की सदर बालक अधिकारक्षेत्राबाहेरील ठिकाणचे आहे, तर मंडळ किंवा समिती, यथास्थिती, जर ते बालकाच्या हिताचे आहे असे समाधानी असेल तर आणि बालकाचे गृह जिल्हाच्या समिती किंवा मंडाळाशी योग्य चौकशीनंतर, उक्त समिती व मंडळ शक्य तितक्या लवकर संबंधित कागदपत्रांसह, विहित केल्याप्रमाणे, बालकाच्या हस्तांतरणाचा आदेश देइल :
परंतु असे की, कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाच्या संदर्भात असा बालकाच्या स्थानांतरणाच आदेश चौकशी पूर्ण झाल्यावरच मंडळाच्या अंतिम आदेशासोबत दिला जाईल :
परंतु आणखी असे की, आंतरराज्य स्थानांतरणासंदर्भात, जर सोयिस्कर असल्यास, बालकास त्याच्या वास्तव्याच्या परिसरातील समिती
किंवा मंडळाकडे हस्तांतरित केले जाईल किंवा राज्याच्या राजधानीच्या समिती किंवा मंडळाकडे हस्तांतरित केले जाईल.
२) जर हस्तांतरणाचा निर्णय निश्चित झाला तर, समिती किंवा मंडळ, आदेश केल्यापासून १५ दिवसांच्या आत बालकास मार्ग सुरक्षा पुरविण्याचा आदेश विशेष बाल सुरक्षा पोलीस केंद्रास देईल :
परंतु असे की, सदर बालक मुलगी असल्यास, तिच्या सुरेक्षेसाठी महिला पोलीस अधिकारी नेमली जाईल :
परंतु आणखी असे की, जेथे विशेष बाल संरक्षण पोलीस केंद्र उपलब्ध नसल्यास समिती किंवा मंडळ ज्या संस्थेत बालक तात्पुरत्या पद्धतीने राहात असेल त्या संस्थेस किंवा जिल्हा बाल संरक्षण केंद्रास, बालकाला प्रवासा दरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी सोबत पाठविण्याचे आदेश देईल.
३) राज्य शासन, सदर बालकास प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविणाऱ्या पथकास अग्रीम प्रवासभत्ता देण्याबाबत नियम तयार करील.
४) स्थानांतरीत केलेल्या बालकास स्वीकारणारी समिती किंवा मंडळ, या अधिनियमानुसार बालकास घरी पोहोचविणे किंवा त्याचे पुनर्वसन करणे किंवा समजात पुनर्सम्मीलन करण्याची जबाबदारी पूर्ण करील.

Exit mobile version