बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १२ :
कायद्याचे उल्लंघन केलेला बालक असल्याचा संशय असलेल्यया व्यक्तीस जामीन :
१) जेव्हा कोणीतीही व्यक्ती, जी सकृतदर्शनी बालक असेल व तिने जामिनपात्र किंवा अजामिनपात्र अपराध केलेला असेल, अशा व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलेले किंवा अडकवून ठेवलेले असल्यास सदर व्यक्ती मंडळासमोर आल्यास किंवा तिला मंडळासमक्ष हजर केल्यास, सदय व्यक्तीला, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये किंवां त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, मुचलक्यासह किंवा मुचलक्याशिवाय जामिनावर मुक्त केले जाईल किंवा परिवीक्षा अधिकाऱ्यांच्या देखरखीखाली ठेवले जाईल किंवा सुयोग्य व्यक्तीच्या निगराणीत दिले जाईल :
परंतु सदर व्यक्तीस मुक्त केल्यास ती व्यक्ती एखाद्या ज्ञात गुन्हेगाराच्या संपर्कात येण्याची शक्यता असेल किंवा सदर व्यक्तीला शारीरिक, मनोवैज्ञानिक किंवा नैतिक धोका पोहोचण्याची शक्यता असेल किंवा मुक्त केल्याने न्यायाचा उद्देश विफल होण्याची शक्यता असल्यास, सदर व्यक्तीला मुक्त केले जाणार नाही आणि अशा परिस्थितीत मंडळ जामीन नाकारण्याची कारणे, तसेच कोणत्या परिस्थितीत सदर निर्णय घेतला गेला ते लेखी नमूद करील.
२) जेव्हा अशा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीस पोट-कलम (१) अन्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जामीनमुक्त करणार नाही, तेव्हा सदर अधिकारी सदर व्यक्तीस, मंडळासमक्ष हजर करेपर्यंत, विहित केल्याप्रमाणे १.(यथास्थिती, निरीक्षण गृहात किंंवा सुरक्षित ठिकाणी) ठेवण्याची व्यवस्था करील.
३) जेव्हा अशा व्यक्तीस पोटकलम (१) अन्वये मंडळाकडून जामीनमुक्त केले जाणार नाही, तेव्हा मंडळ सदर व्यक्तीस, यथास्थिती, लेखी आदेशान्वये चौकशीच्या कालावधीत परिस्थितीनुरुप निरीक्षणगृहात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करेल.
४) जेव्हा कायद्याचे उल्लंघन केलेले बालक, सात दिवसांच्या कालावधीत जामिनाच्या शर्ती पूर्ण करण्याच्या परिस्थितीत नसेल, तेव्हा सदर बालकास आदेशात फेरबदल करण्यासाठी पुन्हा मंडळासमोर उभे केले जाईल.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ६ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.