माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६३ :
उल्लंघनाबाबत आपापसांत समझोता करणे :
१) या १.(अधिनियमाखालील) कोणतेही उल्लंघन, अभिनिर्णय, कार्यवाही सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू केल्यानंतर नियंत्रकाकडून किंवा त्याने विशेषरीत्या प्राधिकृत केलेल्या इतर अधिकाऱ्याकडून किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याकडून आपापसांत मिटवला जाऊ शकेल. मात्र ते, नियंत्रक किंवा असा इतर अधिकारी किंवा अभिनिर्णय करणारा अधिकारी विनिर्दिष्ट करील अशा शर्तीस अधीन असेल:
परंतु, अशाप्रकारे आपसांत मिटवलेल्या उल्लंघनासाठी या अधिनियमाद्वारे जितक्या रकमेची शास्ती लादता येईल त्यापेक्षा अधिक रकमेने मिटवता येणार नाही.
२) एखाद्या व्यक्तीने केलेले पहिले उल्लंघन ज्या तारखेला आपसांत मिटविण्यात आले असेल त्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीमध्ये केलेल्या तशाच किंवा त्याच उल्लंघनाच्या बाबतीत त्या व्यक्तीला पोटकलम (२) मधील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही.
स्पष्टीकरण :
या पोटकलमचाया प्रयोजनासाठी पहिल्या उल्लंघनाची आपसांत तडजोड करण्यात आल्याच्या तारखेपासून तीन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर केलेले कोणतेही दुसरे किंवा नंतरचे उल्लंघन हे पहिले उल्लंघन असल्याचे मानण्यात येईल.
३) कोणत्याही उल्लंघनाची पोटकलम (१) अन्वये आपसांत तडजोड करण्यात आली असेल अशा बाबतीत, अशा उल्लंघनासाठी दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध अशाप्रकारे तडजोड केलेल्या कोणत्याही उल्लंघनाच्या संबंधात कोणतीही कार्यवाही किंवा आणखी कार्यवाही करण्यात येणार नाही.
——-
१.माहिती तंत्रज्ञान (अडचणी दूर करणे) आदेश, २००२ याद्वारे सुधारणा.