माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ५७ :
१.(अपील न्यायाधिकरणाकडे) अपील :
१) पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ते खेरीज करून, नियंत्रकाने किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने या अधिनियामन्वये काढलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, त्या बाबतीत अधिकारिता असणाऱ्या १(अपील न्यायादिकरणाकडे) अपील करता येईल.
२) अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने पक्षकारांच्या संमतीने काढलेल्या कोणत्याही आदेशावर १.(अपील न्यायाधिकरणाकडे अपील करता येणार नाही.
३) पोटकलम (१) खालील प्रत्येक अपील नियंत्रकाच्या किंवा अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याच्या आदेशामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला त्या आदेशाची प्रत ज्या तारखेला मिळाली असेल त्या तारखेपासून पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत दाखल करण्यात आले पाहिजे आणि ते विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असावे व त्यासोबत विहित करण्यात येईल अशी फी असावी :
परंतु, १.(अपील न्यायाधिकरणाचे) अपील पंचेचाळीस दिवसांत दाखल न करण्यास पुरेसे कारण होते याबाबत समाधान झाले तर ते न्यायाधिकरण तो कालावधी समाप्त झाल्यानंतर दाखल करण्यात आलेले अपीलही दाखल करून घेऊ शकेल.
४) पोटकलम (१) खालील अपील मिळाल्यानंतर १.(अपील न्यायाधिकरणाला), अपिलातील पक्षकारांना बाजू
मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर त्यावर, ज्या आदेशाविरूद्ध अपील करण्यात आले असेल तो कायम करणारा, त्यात
फेरबदल करणारा किंवा तो रद्द करणारा त्याला योग्य वाटेल असा आदेश काढता येईल.
५)१.(अपील न्यायाधिकरण) त्याने काढलेल्या प्रत्येक आदेशाची प्रत अपिलातील पक्षकारांना आणि संबंधित नियंत्रकाला किंवा अभिनिर्णय देणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवील.
६) पोटकलम (१) अन्वये १.(अपील न्यायाधिकरणाकडे) दाखल करण्यात आल्यावर शक्य तितक्या लवकर ते न्यायाधिकरण त्यावर कार्यवाही करील आणि ते अपील मिळाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अंतिमरीत्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करील.
——-
१. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे सुधारणा.