Ipc कलम ५०३ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण २२ :
फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा करणे, अपमान करणे आणि त्रास देणे याविषयी :
कलम ५०३ :
फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :
(See section 351(1) of BNS 2023)
जर कोणी दुसऱ्या व्यक्तीला तिचा देह, लौकिक किंवा मालमत्ता याबाबत, किंवा जिच्यामध्ये ती व्यक्ती हितसंबंधित आहे अशा कोणाचाही देह किंवा लौकिक याबाबत क्षती पोचवण्याची धमकी दिली आणि त्यामागे, त्या व्यक्तीला भयभीत करण्याचा, अथवा अशी धमकी अमलात येण्याचे टाळण्याकरिता साधन म्हणून, ती व्यक्ती जी कोणतीही कृती करण्यात विधित: बद्ध नाही ती कृती तिने करावी किंवा ती व्यक्ती जी कोणतीही कृती करण्यास विधित: हक्कदार आहे ती करण्याचे तिने चुकवावे अशी तिला सक्ती करण्याचा उद्देश असेल तर, त्याने फौजदारीपात्र धाकदपटशा केला असे होते.
स्पष्टीकरण :
धमकी दिली गेलेली व्यक्ती ज्या मृत व्यक्तीमध्ये हितसंबंधित असेल तिच्या लौकिकास क्षती पोचवण्याची धमकी ही या कलमाच्या कक्षेत आहे.
उदाहरण :
दिवाणी दावा चालू ठेवण्यापासून (ख) परावृत्त व्हावा यासाठी (क) हा (ख) चे घर जाळण्याची धमकी देतो. (क) हा फौजदारीपात्र धाकदपटशा केल्याबद्दल दोषी आहे.

Leave a Reply