भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३२६-अ :
१.(ॲसिड इत्यादीचा वापर करुन इच्छापूर्वक जबर दुखापत करणे :
(See section 124(1) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ॲसिड इत्यादीचा वापर करुन स्वेच्छेने गंभीर (जबर) दुखापत करणे.
शिक्षा :किमान १० वर्षे किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड पीडीत व्यक्तीच्या उपचारांसाठी देणे
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी, एखाद्या व्यक्तीवर ॲसिड फेकून किंवा तिला ॲसिड देऊन किंवा तिला इजा किंवा क्षती (दुखापत) करण्याच्या उद्देशाने किंवा अशी इजा किंवा दुखापत होईल हे माहीत असताना त्या व्यक्तीला कायमस्वरुपी किंवा आंशिक हानी पोहोचवील किंवा व्यंग निर्माण करील किंवा विद्रूप करील किंवा तिला अपंग करील किंवा जबर इजा पोहोजवील त्याला, दहा वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत इतक्या मुदतीची असू शकेल अशी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
परंतु असे की, असा द्रव्यदंड हा, पीडित व्यक्तीच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी पुरेसा आणि वाजवी असेल.
परंतु आणखी असे की, या कलमान्वये आकारलेला द्रव्यदंड पीडित व्यक्तीला देण्यात येईल.)
——-
१. सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम क्र. १३ द्वारे घातला.