भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२५-ब :
१.(ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात कायदेशीर गिरफदारीला (अटकेला) प्रतिकार करणे, किंवा पळून जाणे, किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सुटका करणे :
(See section 265 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यांसाठी अन्यथा उपबंध केलेला नाही अशा प्रकरणांत कायदेशीर गिरफदारीला प्रतिकार करणे किंवा पळून जाणे किंवा अवैधपणे सुटका करणे.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
——-
कलम २२४ किंवा कलम २२५ यामध्ये किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये ज्यासाठी उपबंध (तरतूद) केलेला नाही, अशा कोणत्याही प्रकरणामध्ये जो कोणी व्यक्ती (इसम) स्वत:च्या किंवा अन्य एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर गिरफदारीला (अटकेला) उद्देशपूर्वक प्रतिकार किंवा अवैध (बेकायदेशीर) अटकाव करील, अथवा त्यास जेथे कायदेशीरपणे स्थानबध्द करण्यात आले अशा कोणत्याही हवालतीमधून पळून जाईल किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करील अथवा अन्य एखाद्या व्यक्तीला जेथे कायदेशीरपणे स्थानबध्द करण्यात आले असेल अशा कोणत्याही हवालतीमधून तिची अवैधपणे सुटका करील किंवा सुटका करण्याचा प्रयत्न करील त्या व्यक्तीला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतकया मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——-
१. १८८६ चा अधिनियम १० – कलम २४(१) द्वारे कलम २२५ क ऐवजी कलमे २२५क व २२५ख ही दाखल करण्यात आली. मूळ कलम २२५क हे १८७० चा अधिनियम २७ – कलम ९ द्वारे समाविष्ट करण्यात आले होते.