अनुच्छेद २८६ : मालाची विक्री..कर बसविण्यासंबंधी निर्बंध :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद २८६ :
मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसविण्यासंबंधी निर्बंध :
(१) मालाची विक्री किंवा खरेदी जेव्हा,--
(क) राज्याच्या बाहेर घडते ; किंवा
(ख) भारताच्या राज्यक्षेत्रात मालाची आयात करण्याच्या किंवा त्याच्याबाहेर मालाची निर्यात करण्याच्या ओघात घडते, तेव्हा त्या बाबतीत, राज्याचा कोणताही कायदा अशा विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसविणार नाही किंवा बसवणे प्राधिकृत करणार नाही.
१.(***)
२.((२) मालाची विक्री किंवा खरेदी ही, खंड (१) मध्ये उल्लेखिलेल्या प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे केव्हा घडते हे ठरविण्यासाठी संसदेला, कायद्याद्वारे तत्त्वे सूत्रबद्ध करता येतील.
३.((३) राज्याच्या कोणताही कायदा हा जेथवर,----
(क) संसदेने, कायद्याद्वारे आंतरराज्यीय व्यापारात किंवा वाणिज्य व्यवहारात विशेष महत्त्वाचा म्हणून घोषित केलेल्या मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवीत असेल किंवा असा कर बसविणे प्राधिकृत करीत असेल ; अथवा
(ख) मालाच्या विक्रीवर किंवा खरेदीवर कर बसवीत असेल किंवा असा कर बसविणे प्राधिकृत करीत असेल आणि असा कर हा अनुच्छेद ३६६च्या खंड (२९क) चा उपखंड (ख), उपखंड (ग) किंवा उपखंड (घ) यात निर्दिष्ट केलेल्या स्वरूपाचा कर म्हणून असेल, तेथवर, तो कायदा, त्या कराच्या आकारणीची पद्धत, दर आणि अन्य आनुषंगिक गोष्टी यांविषयी संसद कायद्याद्वारे विनिर्दिष्ट करील अशा निर्बंधाना आणि शर्तींना अधीन असेल.))
------------
१. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ४ द्वारे खंड (१) चे स्पष्टीकरण गाळले.
२. संविधान (सहावी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ४ द्वारे खंड (२) व (३) यांऐवजी दाखल केले.
३. संविधान (शेहेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९८२ याच्या कलम ३ द्वारे मूळ खंड (३) याऐवजी दाखल केले.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.