अनुच्छेद २४३ : व्याख्या :
भारतीय राज्यघटना
१.भाग ९ :
पंचायती :
अनुच्छेद २४३ :
व्याख्या :
या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,----
(क) जिल्हा याचा अर्थ, एखाद्या राज्यातील जिल्हा, असा आहे ;
(ख) ग्राम सभा याचा अर्थ, ग्राम पातळीवरील पंचायत क्षेत्रांमध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदविण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय, असा आहे ;
(ग) मधली पातळी याचा अर्थ, एखाद्या राज्याच्या राज्यपालाने या भागाच्या प्रयोजनांसाठी मधली पातळी म्हणून अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केली असेल अशी, ग्राम व जिल्हा पातळी यांमधील पातळी, असा आहे ;
(घ) पंचायत याचा अर्थ, ग्रामीण क्षेत्रांसाठी अनुच्छेद २४३-ख अन्वये घटित करण्यात आलेली स्वराज्य संस्था (मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो), असा आहे ;
(ङ) पंचायत क्षेत्र याचा अर्थ, एखाद्या पंचायतीचे प्रादेशिक क्षेत्र, असा आहे;
(च) लोकसंख्या याचा अर्थ, जिचे संबद्ध आकडे प्रकाशित करण्यात आले असतील अशा लगतपूर्वीच्या जनगणनेद्वारे निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या, असा आहे ;
(छ) ग्राम याचा अर्थ, राज्यपालाने या भागाच्या प्रयोजनांसाठी जे ग्राम आहे, असे जाहीर अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केले असेल ते ग्राम, असा आहे आणि यात अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या ग्रामांच्या गटांचाही समावेश होतो.
-------------
१. संविधान (त्र्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२ याच्या कलम २ द्वारे हा भाग समाविष्ट करण्यात आला (२४ एप्रिल १९९३ रोजी व तेव्हापासून). मूळ भाग नऊ संविधान (सातवी सुधारणा) अधिनिमय, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूचीद्वारे गाळला होता.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.