अनुच्छेद १९८ : धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद १९८ :
धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती :
(१) धन विधेयक विधानपरिषदेत प्रस्तुत केले जाणार नाही.
(२) विधानपरिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर, ते विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरिता पाठविले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत, विधानपरिषद, आपल्या शिफारशींसह ते विधेयक विधानसभेकडे परत पाठवील आणि तद्नंतर, विधानसभेला, विधानपरिषदेच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही शिफारशी एकतर स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील.
(३) जर विधानसभेने विधानपरिषदेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या तर, धन विधेयक, विधानपरिषदेने शिफारस केलेल्या व विधानसभेने स्वीकारलेल्या सुधारणांसह दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.
(४) जर विधानपरिषदेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी विधानसभेने स्वीकारल्या नाहीत तर, धन विधेयक, विधानपरिषदेने शिफारस केलेल्यांपैकी कोणत्याही सुधारणेशिवाय विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात, दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.
(५) जर विधानसभेने पारित केलेले व विधानपरिषदेकडे तिच्या शिफारशींकरिता पाठविलेले धन विधेयक, उक्त चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत विधानसभेकडे परत पाठवण्यात आले नाही तर, उक्त कालावधी संपल्यावर, ते विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.