अनुच्छेद १७१ : विधानपरिषदांची रचना :
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद १७१ :
विधानपरिषदांची रचना :
(१) विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील अशा विधानपरिषदेतील सदस्यांची एकूण संख्या, त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १.(एक तृतीयांशाहून)अधिक असणार नाही :
परंतु असे की, एखाद्या राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या काही झाले तरी चाळीसपेक्षा कमी असणार नाही.
(२) संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, एखाद्या राज्याच्या विधानपरिषदेची रचना, खंड (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे राहिल.
(३) एखाद्या राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी,----
(क) शक्य होईल तितपत जवळजवळ एक-तृतीयांश सदस्य हे, त्या राज्यातील नगरपालिका, जिल्हा मंडळे आणि संसद कायद्याद्वारे विनिर्दिष्ट करील अशी अन्य स्थानिक प्राधिकरणे, यांचे सदस्य मिळून बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील;
(ख) शक्य होईल तितपत जवळजवळ एक-बारांश सदस्य हे, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही विद्यापीठाचे, जे निदान तीन वर्षे पदवीधर आहेत अथवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये अशा कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीधरांच्या अर्हतांशी तुल्य म्हणून विहित झालेल्या अर्हता निदान तीन वर्षे ज्यांनी धारण केलेल्या आहेत अशा, त्या राज्यात राहणाऱ्या व्यक्तींनी बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील ;
(ग) शक्य होईल तितपत जवळजवळ एक-बारांश सदस्य हे, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये विहित केल्या जातील अशा व माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अशा, त्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाच्या कामात निदान तीन वर्षे असलेल्या अशा व्यक्तींनी बनलेल्या मतदारगणांकडून निवडून दिले जातील;
(घ) शक्य होईल तितपत जवळजवळ एक-तृतीयांश सदस्य हे, राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून विधानसभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींमधून निवडून दिले जातील ;
(ङ) बाकीचे सदस्य हे, खंड (५) च्या तरतुदीनुसार राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातील.
(४) खंड (३) चे उपखंड (क), (ख) आणि (ग) याअन्वये निवडून द्यावयाचे सदस्य, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये विहित केले जातील अशा क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये निवडले जातील आणि उक्त उपखंडाअन्वये व उक्त खंडाचा उपखंड (घ) अन्वये निवडणुका, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतल्या जातील.
(५) खंड (३) च्या उपखंड (ङ) अन्वये राज्यपालाने नामनिर्देशित करावयाचे सदस्य म्हणजे पुढे दिलेल्या बाबींसंबंधी विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्ती असतील, त्या बाबी अशा :--
साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ व समाजसेवा.
--------------
१.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १० द्वारे एक-चतुर्थांशाहून याऐवजी दाखल केले.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.