Hsa act 1956 कलम ३ : व्याख्या व निर्वचन :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम ३ :
व्याख्या व निर्वचन :
१) या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a)क) गोत्रज – जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने व संपूर्णपणे पुरुषांच्या द्वारे संबंधित असतील तर एक व्यक्ती दुसरीची गोत्रज आहे असे म्हणतात;
(b)ख) आळियसंतान कायदा याचा अर्थ, जर हा अधिनियम पारित झाला नसता तर ज्या व्यक्ती मद्रास आळियसंतान अधिनियम १९४९ (१९४९ चा मद्रास अधिनियम ९) याद्वारे किंवा या अधिनियमात ज्यांच्यासाठी उपबंध केला आहे अशा बाबींच्या संबंधात रुढीप्राप्त अळियसंतान कायद्याने नियंत्रित झाल्या असत्या त्यांना लागू असलेली विधिप्रणाली असा आहे;
(c)ग) भिन्न गोत्रज – जर दोेन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने, पण संपूर्णपणे पुरुषांच्याच द्वारे नव्हे,- अशा प्रकारे संबंधित असतील तर, एक व्यक्ती दुसरीची भिन्न गोत्रज आहे असे म्हणतात;
(d)घ) रुढी व परिपाठ या शब्दप्रयोगांद्वारे, जो नियम सातत्याने व एकाच रुपात दीर्घकाळ पाळला जात असून ज्याला हिंदूमध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जनजातीत, समाजात, समूहात किंवा कुलात कायद्याचे बळ प्राप्त झालेले आहे असा कोणताही नियम दर्शविला जातो :
परंतु, तो नियम निश्चित असावा आणि गैरवाजवी किंवा लोकधोरणाच्या विरुद्ध नसावा :
आणि आणखी असे की, फक्त कुलालाच लागू असलेल्या नियमांच्या बाबतीत, त्या कुलाने तो सोडून दिलेला नसावा;
(e)ङ) सख्खे नाते, सापत्न नाते आणि सहोदर नाते –
एक) जेव्हा दोन व्यक्तीचा समान पूर्वजपुरुषापासून त्याच्या एका पत्नीच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या एकमेकींशी सख्ख्या नात्याने आणि जेव्हा त्याचा समान पूर्वजपुरुषापासून पण त्याच्या निरनिराळ्या पत्नींच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या व्यक्ती एकमेकींशी सापत्न नात्याने संबंधित आहेत असे म्हणतात;
दोन) जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वजस्त्रीपासून पण तिच्या निरनिराळ्या पतींच्या द्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा, त्या व्यक्ती एकमेकींशी सहोदर नात्याने संबंधित आहेत असे म्हणतात;
स्पष्टीकरण :
या खंडामध्ये पूर्वजपुरुष यात पित्याचा व पूर्वजस्त्री यात मातेचा समावेश आहे;
(f)च) वारसदार याचा अर्थ, जी व्यक्ती या अधिनियमाखाली अकृतमृत्यपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास हक्कदार आहे अशी कोणतीही व्यक्ती – पुरुष वा स्त्री – असा आहे;
(g)छ) अकृतमृत्युपत्र व्यक्ती – एखाद्या व्यक्तीने ज्या संपत्तीची परिणामक होण्याजोगी अशी मृत्युपत्रीय व्यवस्था केलेली नसेल तिच्यासंबंधी तो किंवा ती मृत्युपत्र न करता मरण पावली असे मानले जाते;
(h)ज) मरुमक्कतायम कायदा याचा अर्थ, –
a)क) जर हा अधिनियम पारित झाला नसता तर, या अधिनियमात ज्यांच्यासाठी उपबंध केला आहे त्या बाबींच्या संबंधात मद्रास मरुमक्कत्तायम अधिनियम, १९३२ (१९३३ चा मद्रास अधिनियम २२); त्रावणकोर नायर अधिनियम (११०० क चा २); त्रावणकोर एझावा अधिनियम (११०० क चा ३); त्रावणकोर नांजिनाडु, वेळ्ळाळन अधिनियम (११०१ क चा ६) त्रावणकोर क्षत्रिय अधिनियम (११०८ क चा ७); त्रावणकोर कृष्णण्वक मरुमक्कथायी अधिनियम (१११५ क चा ७); कोचीन मरुमक्कथायम अधिनियम (१११३ क चा ३३); किंवा कोचीन नायर अधिनियम (१११३ क चा २९) याद्वारे नियंत्रित झाल्या असत्या ; किंवा
b)ख) ज्या व्यक्ती त्रावणकोर – कोचीन किंवा मद्रास राज्यात १.(१ नोव्हेंबर १९५६ च्या निकटपूर्वी ते अस्तित्वात होते त्याप्रमाणेŸ) ज्यातील घटकव्यक्ती मोठ्या प्रमाणावर अधिवासी आहेत अशा कोणत्याही समाजाच्या आहेत आणि हा अधिनियम पारित झाला नसता तर, ज्या या अधिनियमात ज्यांच्यासाठी उपबंध केला आहे त्या बाबींच्या संबंधात, ज्या वारसा-पद्धतीत स्त्रीवंशक्रमाद्वारे वंशाचा मागोवा घेतला जातो अशा कोणत्याही वारसा-पद्धतीने नियंत्रित झाल्या असत्या,
त्या व्यक्तींना लागू असलेली विधिप्रणाली असा आहे, पण त्यात आळियसंतान कायद्याचा समावेश नाही ;
(i)(झ) नंबूदिरी कायदा याचा अर्थ, जर हा अधिनियम पारित झाला नसता तर, या अधिनियमात ज्यांच्यासाठी उपबंध केला आहे त्या बाबींच्या संबंधात ज्या व्यक्ती मद्रास नंबूदिरी अधिनियम, १९३२ (१९३३ चा, मद्रास अधिनियम, २१); कोचीन, नंबूदिरी अधिनियम (१११३ क चा १७); किंवा त्रावणकोर मलयाळम ब्राम्हण अधिनियम (११०६ क चा ३ ), यांद्वारे नियंत्रित झाल्या असत्या अशा व्यक्तींना लागू असलेली विधिप्रणाली असा आहे;
(j)(ञ)संबंधित याचा अर्थ, औरस नात्याने संबंधित असा आहे :
परंतु, अनौरस अपत्ये त्यांच्या मातेशी व एकमेकांशी संबंधित असल्याचे मानले जाईल आणि त्यांचे औरस वंशज त्यांच्याशी व एकमेकांशी संबंधित असल्याचे मानले जाईल आणि नातेसंबंध व्यक्त करणाऱ्या किंवा नातलग दर्शविणाऱ्या कोणत्याही शब्दाचा अर्थ तद्नुसार लावला जाईल.
(२) या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, पुल्लिंगवाचक शब्दांमध्ये स्त्रियांचा समावेश असल्याचे गृहीत धरले जाणार नाही.
———–
१. विधि अनुकूलन (क्रमांक ३) आवेश, १९५६ द्वारे घातले.

Leave a Reply