हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १४ :
विवाहानंतर १.(एक) वर्षाच्या आत कोणताही विनंतीअर्ज सादर करावयाचा नाही :
१) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्याकरता केलेला कोणताही विनंतीअर्ज, १.(तो विनंतीअर्ज सादर होण्याच्या दिनांकास विवाहच्या दिनांकापासून एक वर्ष लोटले असल्याखेरीज) कोणत्याही न्यायालयाने विचारार्थ स्वीकारणे विधिमान्य होणार नाही :
परंतु, न्यायालयाला, त्याच्याकडे उच्च न्यायालय त्याबाबत करील अशा नियमांना अनुसरुन अर्ज आल्यावर त्या प्रकरणी विनंतीअर्जदाराला आत्यंतिक कष्ट सोसावे लागत आहेत किंवा उत्तरवादी आत्यंतिक नीतिभ्रष्टतेने वागला आहे या कारणावरुन विवाहाच्या १.(एक वर्ष) लोटण्यापूर्वी विनंतीअर्ज सादर केला जाण्यास मुभा देता येईल, पण विनंतीअर्जदाराने कोणत्याही प्रकारे प्रकरणाच्या स्वरुपाबाबत अपवेदन किंवा लपवणूक करुन विनंतीअर्ज सादर करण्यासाठी अनुज्ञा मिळवली असे जर विनंतीअर्जाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिसून आले तर न्यायालयाला, त्याने हुकूमनामा अधिघोषित केल्यास, विवाहाच्या दिनांकापासून १.(एक वर्ष) संपून जाईपर्यंत हुकूमानाम परिणामक होणार नाही या शर्तीवर तसे करता येईल अथवा विनंतीअर्ज अशा काढून टाकता येईल – मात्र उक्त एक वर्ष संपल्यानंतर जो करता येईल असा कोणताही विनंतीअर्ज अशा काढून टाकण्यात आलेल्या विनंतीअर्जाच्या पुष्ट्यर्थ अभिकथित केलेल्या किंवा सारत: त्याच तथ्यांवरुन आणण्यास त्यामुळे बाध येणार नाही.
२) विवाहाच्या दिनांकापासून १.(एक वर्ष) संपण्यापूर्वी घटस्फोटाकरता विनंतीअर्ज सादर करण्याच्या अनुज्ञेसाठी या कलमाखाली करण्यात आलेला अर्ज निकालात काढताना, विवाहसंबंधातून काही अपत्ये झालेली असल्यास त्यांचे हितसंबंध आणि उक्त १.(एक वर्ष) संपण्यापूर्वी पक्षांमध्ये सलोखा होण्याची वाजवी संभाव्यता आहे काय हा प्रश्न न्यायालय लक्षात घेईल.
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ९ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी घातले.