हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १३ :
घटस्फोट :
१) कोणत्याही विवाहाचा – मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो – पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही विनंतीअर्ज सादर केल्यावर पुढील कारणावरुन घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विच्छेद करता येईल, ते असे –
१.(एक) दुसऱ्या पक्षाने विधिपूर्वक विवाह झाल्यानंतर तिच्या वा त्याच्या विवाहासाथी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीशी स्वेच्छेने संगोग केलेला आहे; किंवा
(ia)एक-क) दुसऱ्या पक्षाने विधिपूर्वक विवाह झाल्यानंतर विनंतीअर्जदाराला क्रूरपणाची वागणूक दिली आहे; किंवा
(ib)एक-ख) विनंतीअर्ज दाखल केल्याच्या लगतपूर्वी किमान दोन वर्ष तरी दुसऱ्या पक्षाने विनंतीअर्जदाराचा अभित्याग केलेला आहे; किंवा)
१.(तीन) दुसऱ्या पक्षाला असाध्य स्वरुपाचे मनोवैकल्य आहे, किंवा विनंतीअर्जदार उत्तरवादीसमवेत आयुष्य घालवू शकेल अशी अपेक्षा करणे वाजवी होणार नाही अशा प्रकारचा वा अशा प्रमाणात त्या दुसऱ्या पक्षामध्ये मानसिक बिघाड सातत्याने अथवा अधूनमधून होत आहे.
स्पष्टीकरण :
या खंडात, –
(a)क) मानसिक बिघाड शब्दप्रयोगाचा अर्थ, मानसिक आजार, मनाची कुंठित वा अपूर्ण वाढ, मनो विकृतिजन्य वा अन्य प्रकारचा मानसिक बिघाड वा नि:समर्थता असा आहे आणि यात द्विमनस्कताही अंतर्भूत आहे;
(b)ख) मनोविकृतिजन्य बिघाड या शब्दप्रयोगाचा अर्थ, ज्यामुळे दुसऱ्या पक्षाची वागणूक प्रमाणाबाहेर आक्रमक किंवा अतिशय बेजबाबदारपणाची बनते असा कायम स्वरुपाचा मानसिक बिघाड अथवा नि:समर्थता असा आहे (यात बुद्धिमत्तेची अवसामान्यता अंतर्भूत असो वा नसो), आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार होण्याची आवश्यकता किंवा तशी त्याची पात्रता असो वा नसो; किंवा)
८.(***)
पाच) २.(***) दुसरा पक्ष सांक्रामिक स्वरुपाच्या गुप्त रोगाने पीडित आहे; किंवा
सहा) दुसऱ्या पक्षाने एखाद्या धार्मिक संप्रदायाची दीक्षा घेऊन प्रपंचाचा त्याग केला आहे; किंवा
सात) दुसरा पक्ष हयात असता तर ते स्वाभाविकपणे ज्यांच्या ऐकिवात आले असते त्या व्यक्तीच्या तो पक्ष हयात असल्याचे सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ऐकिवात नाही;
३.(***)
५.(स्पष्टीकरण :
या पोटकलमात, अभित्याग या शब्दप्रयोगाचा अर्थ, विनंतीअर्जदाराचा, विवाहातील दुसऱ्या पक्षाने कोणत्याही वाजवी कारणाविना आणि विनंतीअर्जदाराच्या संमतीशिवाय किंवा इच्छेविरुद्ध अभित्याग करणे असा आहे, आणि यात, विवाहातील दुसऱ्या पक्षाने विनंतीअर्जदाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याच्या कृतीचाही समावेश आहे, आणि या शब्दप्रयोगाच्या सर्व व्याकरणिक रुपभेदांचा व सजातीय शब्दप्रयोगांचा अर्थ तद्नुरुप लावण्यात येईल.)
(1A)४.(१क) विवाह या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो – त्यातील कोणत्याही पक्षाला पुढील कारणावरुनही घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्याकरता विनंतीअर्ज सादर करता येईल, ते असे :-
एक) विवाहातील पक्ष ज्या कार्यवाहीत पक्षकार होते तीत न्यायिक फारकतीचा हुकूमनामा झाल्यानंतर ६.(एक वर्ष) किंवा त्याहून अधिक काळ त्या पक्षांनी पुन्हा दांपत्य भावाने एकत्र राहण्यास सुरुवात केलेली नाही ; किंवा
दोन) विवाहातील पक्ष ज्या कार्यवाहीत पक्षकार होते तीत दांपत्याधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर ६.(एक वर्ष) किंवा त्याहून अधिक काळ त्या पक्षामध्ये पुन्हा दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन झालेली नाही.)
२) पत्नीला पुढील कारणांवरुनही घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे आपल्या विवाहाच विच्छेद करण्याकरता विनंतीअर्ज सादर करता येईल, ते असे :-
एक) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी विधिपूर्वक लावलेल्या कोणत्याही विवाहाच्या बाबतीत, अशा प्रारंभापूर्वी पतीने पुन्हा विवाह केलेला आहे किंवा पतीची अशा प्रारंभापूर्वी विवाहित अशी अन्य कोणतीही पत्नी विनंतीअर्जदाराचा विवाह विधिपूर्वक लागण्याच्या वेळी हयात होती :
परंतु, यांपैकी कोणत्याही बाबतीत, ती अन्य पत्नी विनंतीअर्ज सादर होण्याच्या वेळी हयात असावी ;
दोन) विवाह विधिपूर्वक झाल्यानंतर पती बलात्कार, समसंभोग किंवा ७. (पशुगमन याबद्दल दोषी होता; किंवा)
५.(तीन) हिन्दू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६ (१९५६ चा ७८) याच्या कलम १८ खालील दाव्यामध्ये, किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) याच्या कलम १२५ खालील (किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८ (१८९८ चा ५) याचे तत्सम कलम ४८८ याखालील) कार्यवाहीमध्ये, पतीने पत्नीचा निर्वाहखर्च द्यावा असा त्याच्याविरुद्ध हुकूमानामा किंवा, प्रकरणपरत्वे, आदेश देण्यात आलेला आहे – मग पत्नी जरी पतीपासून वेगळी राहात असली तरी आणि असा हुकूमनामा किंवा आदेश काढल्यापासून एक वर्षापर्यंत वा अधिक काळपर्यंत त्या पक्षांनी पुन्हा दांपत्यभावाने एकत्र राहण्यास सुरुवात केलेली नसली तरी हरकत नाही;
चार) तिचा विवाह (मग त्याची परिपूर्ती झालेली असो वा नसो) तिच्या वयाला पंधरा वर्ष पूर्ण होण्याआधी विधिपूर्वक लावण्यात आलेला होता आणि तिचे तेवढे वय झाल्यानंतर परंतु ती अठरा वर्षांची होण्याआधी तिने विवाहाचा इन्कार केलेला होता.
स्पष्टीकरण :
विवाहविषयक कायदे (विशोधन) अधिनियम १९७६ (१९७६ चा ६८) याच्या प्रारंभापूर्वी वा नंतर विवाह झालेला असला तरीही हा खंड लागू होतो.)
———-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे मूळ खंडाऐवजी घातले.
२. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे विवक्षित शब्द गाळले.
३. १९६४ चा अधिनियम ४४, कलम २ द्वारे खंड (सात) च्या अखेरीचा किंवा हा शब्द आणि खंड (आठ) व खंड (नऊ) गाळले.
४. १९६४ चा अधिनियम ४४ कलम २ द्वारे घातले.
५. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे घातले.
६. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे दोन वर्षे याऐवजी घातले.
७. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे पशुगमन याबद्दल दोषी होता याऐवजी घातले.
८. चार) २.(***) दुसरा पक्ष उग्र व असाध्य स्वरुपाच्या कुष्ठरोगाने पीडित आहे; किंवा हा खंड २०१९ चा ६ कलम ५ द्वारे गाळण्यात आला.