Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ६५ : ग्राहकास (उपभोक्यास) दुखापत किंवा मृत्यु झाल्यास द्यावयाची नुकसान भरपाई :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६५ :
ग्राहकास (उपभोक्यास) दुखापत किंवा मृत्यु झाल्यास द्यावयाची नुकसान भरपाई :
या प्रकरणाच्या इतर कोणत्याही तरतुदींस बाधा न आणता, जर एखाद्या व्यक्तीने स्वत: किंवा तिच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारा अन्न (खाद्य) पदार्थाच्या उत्पादन, वितरण, विक्री किंवा आयात केल्यामुळे कोणत्याही ग्राहकास दुखापत किंवा त्याचा मृत्यु झाल्यास, न्यायनिर्णय अधिकाऱ्याने किंवा यथास्थिति न्यायालयाने दुर्घटनाग्रस्त व्यक्तीस किंवा तिच्या कायदेशीर प्रतिनिधीस निम्नलिखित नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देणे कायदेशीर असेल,-
(a) क) मृत्यु झाल्यास कमीत कमी पाच लाख रुपए;
(b) ख) गंभीर दुखापत झाल्यास तीन लाख रुपयांपर्यंत; आणि
(c) ग) दुखापतीच्या अन्य बाबतीत, एक लाख रुपयांपर्यंत :
परंतु असे की, नुकसान भरपाई शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत घटना घडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत दिली जाईल :
परंतु आणखी असे की, मृत्यु झाला असेल तर घटनेच्या तीस दिवसांच्या आत मृताच्या नातेवाईकांना अंतरिम (तात्पुरती) मदत दिली जाईल.
२) कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापत किंवा मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले असेल तेव्हा न्यायनिर्णय अधिकारी किंवा न्यायालय, दोषी ठरविलेल्या व्यक्तीचे नाव, राहण्याचा पत्ता, अपराध आणि त्याच्यावर लादलेली शास्ती या गोष्टी, निर्देश देईल अशा वृत्तपत्रात व अशा रीतीने अपराध्याच्या खर्चाने प्रसिद्ध करील आणि अशा प्रकाशनाचा खर्च दोषसिद्ध होण्याचा खर्चाचा भाग मानला जाईल आणि तो दंडाच्या स्वरुपात वसूल केला जाईल.
३) न्यायनिर्णय अधिकारी किंवा न्यायालय –
(a) क) ग्राहकास (उपभोक्त्यास) गंभीर दुखापत किंवा त्याचा मृत्यु झाला असेल तर, अनुज्ञप्ती (परवाना) रद्द करण्याचा, बाजारातील माल पुन्हा मागविण्याचा, आस्थापना व तिची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देऊ शकेल;
(b) ख) इतर अन्य बाबतीत प्रतिबंध करण्याचे आदेश देईल.

Exit mobile version