पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम ६ :
पर्यावरणी प्रदूषणाच्या नियमनाकरिता नियम :
(१) केंद्र सरकार, कलम ३ मध्ये निदेशिलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबीच्या संबंधात, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियम करू शकेल.
(२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींकरिता उपबंध करता येतील, त्या बाबी अशा :
(a) (क) विविध क्षेत्रांकरिता आणि प्रयोजनांकरिता हवा, पाणी, किंवा माती यांच्या दर्जाची मानके;
(b) (ख) विविध क्षेत्रांकरिता विविध पर्यावरणी प्रदूषकांच्या (आवाज धरून) संहतीच्या मान्य कमाल मर्यादा;
(c) (ग) जोखमीचे पदार्थ हाताळण्याची कार्यपद्धती आणि संरक्षण तरतुदी;
(d) (घ) विविध क्षेत्रांमध्ये जोखमीचे पदार्थ हाताळण्यास मनाई आणि निर्बंध;
(e) (ङ) उद्योगांची ठिकाणे आणि प्रक्रिया पार पाडणे आणि कार्यचालन यांस विविध क्षेत्रांत असलेली मनाई आणि निर्बंध;
(f) (च) ज्या अपघातांमुळे पर्यावरणी प्रदूषण होण्याची शक्यता असेल अशा अपघातांना प्रतिबंध करण्याच्या आणि अशा अपघातांवरील सुधारात्मक उपाययोजनांकरिता उपबंध करण्याच्या कार्यपद्धती आणि संरक्षण तरतुदी.