पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
प्रकरण २ :
केंद्र सरकारच्या सर्वसाधारण शक्ती :
कलम ३ :
पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शास्ती :
(१) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या आणि त्याचा दर्जा सुधारण्याच्या आणि पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या, त्याचे नियंत्रण करण्याच्या आणि त्या उपशम करण्याच्या प्रयोजनांकरिता, आवश्यक किंवा समयोचित वाटतील असे सर्व उपाय योजण्याची शक्ती केंद्र सरकारला असेल.
(२) विशेषत: आणि पोटकलम (१) च्या उपबंधांच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता, अशा उपायांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीच्या संबंधातील उपाययोजनांचा समावेश असू शकेल, त्या बाबी अशा :
(एक) राज्य शासने, अधिकारी आणि –
(a) (क) या अधिनियमाखालील किंवा त्याखाली केलेल्या नियमांखालील; किंवा
(b) (ख) या अधिनियमाच्या उद्दिष्टांशी ज्यांचा संबंध जोडता येईल अशा, त्या त्या वेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही इतर कायद्याखालील, इतर प्राधिकारी यांच्या कार्याचा समन्वय करणे;
(दोन) पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करणे, त्याचे नियंत्रण व उपशम यांसाठी एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे;
(तीन) पर्यावरणाच्या विविध स्वरूपांच्या संबंधात दर्जाविषयक मानके विहित करणे;
(चार) कोणत्याही विविध साधनांपासून होणाऱ्या पर्यावरणी प्रदूषकांच्या उत्सर्जनासंबंधी किंवा निस्सारणासंबंधी मानके घालून देणे :
परंतु, वेगवेगळ्या साधनांपासून पर्यावरणी प्रदूषकांचे जे उत्सर्जन किंवा निस्सारण होते त्याचा दर्जा व घटकरचना लक्षात घेऊन, या खंडान्वये अशा साधनांकरिता उत्सर्जनाची व निस्सारणाची वेगवेगळी मानके घालून देता येतील;
(पाच) कोणतेही उद्योग, कार्यचालन किंवा प्रक्रिया अथवा उद्योग, कार्यचालन किंवा प्रक्रिया यांचे वर्ग जेथे पार पाडता येणार नाहीत किंवा विवक्षित संरक्षण तरतुदींच्या अधीनतेने पार पाडता येतील अशा क्षेत्रांवरील निर्बंध;
(सहा) ज्या अपघातांमुळे पर्यावरणी प्रदूषण होण्याची शक्यता असेल अशा अपघातांना प्रतिबंध करण्याच्या कार्यपद्धती आणि संरक्षण तरतुदी आणि अशा अपघातांवरील सुधारात्मक उपाययोजना घालून देणे;
(सात) जोखमीचा पदार्थ हाताळण्याची कार्यपद्धती व संरक्षक तरतुदी विहित करणे;
(आठ) पर्यावरणी प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतील अशा निर्मितीप्रक्रिया, सामग्री आणि पदार्थ यांची तपासणी करणे;
(नऊ) पर्यावरणी प्रदूषणाच्या समस्यांशी संबंधित अन्वेषणे आणि संशोधन करणे आणि त्याचा पुरस्कार करणे;
(दहा) कोणत्याही जागा, संयंत्र, सामग्री, यंत्रसामग्री, निर्मिती किंवा इतर प्रक्रिया, सामग्री किंवा पदार्थ यांचे निरीक्षण करणे आणि पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करण्याचे, त्याचे नियंत्रण आणि उपशम करण्याचे उपाय योजण्याकरिता त्यास आवश्यक वाटतील अशा प्राधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना किंवा व्यक्तींना असे निदेश आदेशाद्वारे देणे;
(अकरा) या अधिनियमान्वये, पर्यावरणी प्रयोगशाळांकडे आणि संस्थेकडे सोपवलेली कामे पार पाडण्याकरिता अशा पर्यावरणी प्रयोगशाळा व संस्था यांची स्थापना करणे किंवा त्यांना मान्यता देणे;
(बारा) पर्यावरणी प्रदूषणाशी संबंधित बाबीसंबंधीची माहिती गोळा करणे आणि तिचा प्रसार करणे;
(तेरा) पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध करणे, त्याचे नियंत्रण व उपशम यांच्याशी संबंधित नियमपुस्तिका, संहिता किंवा मार्गदर्शिका तयार करणे;
(चौदा) या अधिनियमाच्या उपबंधांचे प्रभावी कार्यान्वयन साध्य करण्याच्या प्रयोजनाकरिता केंद्र सरकारला आवश्यक आणि समयोचित वाटतील अशा इतर बाबी.
(३) या अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता तसे करणे केंद्र सरकारला आवश्यक किंवा समयोचित वाटत असेल तर, त्यास, राजपत्रात प्रकाशित केलेल्या आदेशाद्वारे, या अधिनियमाखालील केंद्र सरकारच्या शक्ती व कार्ये (कलम ५ अन्वये निदेश देण्याची शक्ती धरून) वापरण्याच्या आणि पार पाडण्याच्या प्रयोजनाकरिता आणि त्या आदेशामध्ये विनिदेश करण्यात येईल त्याप्रमाणे पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या बाबींच्या संबंधात उपाययोजना करण्याकरिता, त्या आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा नावाने किंवा नावांनी प्राधिकरण किंवा प्राधिकरणे घटित करता येतील आणि केंद्र सरकारच्या पर्यवेक्षणाच्या आणि नियंत्रणाच्या आणि अशा आदेशाच्या उपबंधाच्या अधीनतेने, जणू काही त्या शक्ती वापरण्याची किंवा ती कार्ये पार पाडण्याची किंवा अशा उपाययोजना करण्याची शक्ती अशा प्राधिकरणाला किंवा प्राधिकरणांना या अधिनियमान्वयेच प्रदान करण्यात आली असल्याप्रमाणे अशा प्राधिकरणाला किंवा प्राधिकरणांना त्या आदेशांमध्ये निर्देशिलेल्या शक्ती वापरता येतील, किंवा कार्ये पार पाडता येतील किंवा उपाययोजना करता येतील.