सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३
(सन २००३ चा ३४)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
सिगारेटच्या आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीस प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंबंधातील व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तद्नुषंगित बाबी यासंबंधी तरतूद करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, ३९ व्या जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या १५ मे १९८६ रोजी आयोजित केलेल्या चौदाव्या सर्वसमावेशक बैठकीत पारित केलेल्या ठराव्यात जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या ज्या राष्ट्रांनी अजूनपर्यंत तशी उपाययोजना केली नाही अशा राष्ट्रांना असे आवाहन केले आहे की, धूम्रपान न करणाऱ्या लोकांना तंबाखूच्या धुरापासून होणाऱ्या अपायांना अनैच्छिकपणे बळी पडण्यापासून प्रभावी संरक्षण पुरविण्यात येईल याबाबत खात्री करून घेण्यासाठी आणि तंबाखूचा वापर करण्याचे व्यसन जडण्यापासून मुलांचे आणि तरूणांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी उपाययोजना करावी;
आणि ज्याअर्थी, ४३ व्या जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या १७ मे १९९० रोजी आयोजित केलेल्या चौदाव्या सर्वसमावेशक बैठकीत, ३९ व्या जागतिक आरोग्य संघटनेने पारित केलेल्या ठरावात व्यक्त केलेल्या चिंतेचा पुनरूच्चार केला आहे आणि सदस्य राष्ट्रांना असे आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांच्या तंबाखू नियंत्रणाविषयक धोरणांचा कायदा बनवण्याबाबत विचार करावा आणि त्यांच्या नागरिकांना व विशेषकरून गर्भवती महिला व मुले यांसारख्या धोका संभवणाऱ्या गटाकडे लक्ष देऊन त्यांना तंबाखूच्या धूरापासून होणाऱ्या अपायांना अनैच्छिकपणे बळी पडण्यापासून संरक्षण देण्याकरिता उपाययोजना करावी, तंबाखूच्या वापरापासून परावृत्त करावे आणि त्यावर वाढते निर्बंध लादावेत आणि एकंदरीत, तंबाखू संबंधात सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती, त्यास प्रोत्साहन देणे आणि त्या पुरस्कृत करणे या गोष्टी नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत;
आणि ज्याअर्थी, लोकहितासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तंबाखूबाबत व्यापक कायदा अधिनियमित करणे इष्ट वाटते;
आणि ज्याअर्थी, संविधानाच्या अनुच्छेद ४७ द्वारे व्यादिष्ट केल्यानुसार, एकंदरीत सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने, जे आरोग्यास घातक आहे अशा सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या वापरास प्रतिबंध करणे इष्ट आहे;
आणि ज्याअर्थी, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीस प्रतिबंध करणे आरि त्याचा व्यापार व वाणिज्य उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींसाठी तरतूद करणे इष्ट आहे;
आणि त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चोपन्नाव्या वर्षी, संसदेद्वारे तो पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
————
१) या अधिनियमास, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापारर व वाणिज्यव्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम २००३ असे म्हणावे.
२) त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
३) केन्द्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा १.(दिनांकास) तो अंमलात येईल आणि या अधिनियमाच्या निरनिराळ्या तरतुदींसाठी निरनिराळे दिनांक नियत करता येतील.
——–
१. १ डिसेंबर २००७, कलम ७ चे पोटकलम (१), (२), (३) आणि (४), एस.एस. ८, ९, १० आणि २०, अधिसूचना क्रमांक का. आ. १९५५ (ई) दिनांक १६ नोव्हेंबर, पहा भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, खंड ३ (दोन).