Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद ३५८ : आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५८ :
आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद १९ च्या तरतुदी निलंबित असणे :
१.((१))२.(भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता युद्धामुळे किंवा परचक्रामुळे धोक्यात आली आहे असे घोषित करणारी आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधीत) अनुच्छेद १९ मधील कोणत्याही गोष्टींमुळे, भाग तीन मध्ये व्याख्या केलेले राज्य, त्या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी नसत्या तर एरव्ही, जो कायदा किंवा शासकीय कारवाई करण्यास सक्षम झाले असते, असा कोणताही कायदा किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करण्याच्या राज्याच्या अधिकारावर निर्बंध पडणार नाही. पण याप्रमाणे केलेला कोणताही कायदा, ती उद्घोषणा अंमलात असण्याचे बंद होताच अक्षमतेच्या व्याप्तीपर्यंत अंमलात असण्याचे बंद होईल. मात्र, तो कायदा याप्रमाणे अंमलात असण्याचे बंद होण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील :
३.(परंतु असे की, ४.(जेव्हा अशी आणीबाणीची उद्घोषणा) भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त एखाद्याच भागामध्ये अंमलात असेल तेव्हा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या ज्या भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेथील किंवा त्याच्या संबंधातील हालचालींमुळे भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत, ज्यामध्ये किंवा ज्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात नसेल असे कोणतेही राज्य किंवा संघ राज्यक्षेत्र याच्या संबंधात किंवा तेथे या अनुच्छेदान्वये असा कोणताही कायदा करता येईल किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करता येईल.)
५.((२) खंड (१) मधील कोणतीही गोष्ट,—
(क) ज्या कोणत्याही कायद्यामध्ये, तो, करण्यात आला त्यावेळी अंमलात असलेल्या आणीबाणीच्या उद्घोषणेसंबंधीचा तो कायदा आहे, अशा आशयाचे कथन अंतर्भूत नसेल त्या कायद्याला, किंवा
(ख) असे कथन अंतर्भूत असलेल्या कायद्यान्वये नव्हे तर अन्यथा केलेल्या कोणत्याही शासकीय कारवाईला, लागू असणार नाहीे.)
———-
१. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३९ द्वारे या अनुच्छेदास खंड (१) असा नवीन क्रमांक दिला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३९ द्वारे आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना या मजकुराऐवजी दाखल केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ५२ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
४. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३९ द्वारे जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा या मजकुराऐवजी दाखल केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ३९ द्वारे समाविष्ट केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version