Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद ३३ : या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३३ :
१.(या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार :
या भागाने प्रदान केलेले हक्क,
(क) सशस्त्र सेनादलांचे सदस्य ; किंवा
(ख) ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य ; किंवा
(ग) राज्याने, गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्तवार्ता यांच्या प्रयोजनार्थ, स्थापन केलेला ब्युरो किंवा इतर संघटना यामध्ये नेमलेल्या व्यक्ती ; किंवा
(घ) खंड (क) ते (ग) यामध्ये निर्देशित केलेले कोणतेही दल, ब्युरो किंवा संघटना यांच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्यासंबंधात नेमलेल्या व्यक्ती, यांना लागू करताना, निश्चितपणे त्यांच्या कर्तव्यांचे योग्यप्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी ते हक्क कोणत्या व्याप्तीपर्यंत निर्बंधित किंवा निराकृत करण्यात यावेत, हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल.)
——————–
१. संविधान (पन्नासावी सुधारणा) अधिनियम, १९८४ याच्या कलम २ द्वारे मूळ अनुच्छेद ३३ ऐवजी दाखल केला.

Exit mobile version